अद्रकाचे भाव कोसळल्याने शेतकरी अडचणीत
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 5, 2021 04:07 AM2021-02-05T04:07:28+5:302021-02-05T04:07:28+5:30
आळंद : फुलंब्री तालुक्यातील आळंद परिसरात यावर्षी शेतकऱ्यांनी मोठ्या प्रमाणात अद्रकाची लागवड केली आहे. उत्पन्नाच्या अपेक्षेने त्यावर मोठा खर्चही ...
आळंद : फुलंब्री तालुक्यातील आळंद परिसरात यावर्षी शेतकऱ्यांनी मोठ्या प्रमाणात अद्रकाची लागवड केली आहे. उत्पन्नाच्या अपेक्षेने त्यावर मोठा खर्चही केला. मात्र, अद्रकाचे भाव प्रचंड कोसळल्याने शेतकऱ्यांचे मनोबलही ढासळले असून, ते अडचणीत सापडले आहेत.
परिसरातील आळंद, उमरावती, जातवा, सताळा बु., पिंपरी, नायगव्हाण, खामगाव व परिसरातील शेतकरी दरवर्षी कापूस, मका पिके घेतात. तसेच नगदी पैसे देणारे पीक म्हणून अद्रकाचीही लागवड केली जाते. एकरी मिळणारे शंभर ते दीडशे क्विंटल उत्पन्न व भाव चांगले असल्याने तसेच पाण्याचे प्रमाण चांगले असल्याने यंदा अद्रक लागवडीत या परिसरात आणखी मोठी वाढ झाली आहे. मात्र, सध्या अद्रक काढणीवर आली असताना भावात प्रचंड घसरण झाली असून, आळंद परिसरात व्यापारी एक हजार ते बाराशे रुपये प्रतिक्विंटलप्रमाणे अद्रक खरेदी करीत आहेत. लागवड खर्चही निघत नसल्याने शेतकरी यामुळे मेटाकुटीला आले आहेत. विहिरींची पाणीपातळी घटत असल्याने जास्त दिवस अद्रक ठेवणे शेतकऱ्यांना परवडणारे नसल्याने ते मातीमोल भावाने अद्रक व्यापाऱ्यांना विकत असल्याचे चित्र सध्या दिसत आहे.
चौकट
लागवड खर्च अधिक
चांगले उत्पन्न मिळावे, याकरिता शेतकऱ्यांनी अद्रक पिकावर मोकळ्या हाताने खर्च केला. सरासरी ४ हजार रुपये क्विंटलप्रमाणे बियाणे खरेदी करून केलेली लागवड. त्यानंतर खते, औषधी यावर मोठ्या प्रमाणावर खर्चही केला. चार महिन्यांपूर्वी पीक अपरिपक्व असताना सरासरी अठराशे ते दोन हजार रुपये प्रतिक्विंटल भाव अद्रकाला मिळत होता. मात्र, अद्रक काढणी सुरू झाल्याबरोबर हा भाव एक हजार ते बाराशे रुपयांपर्यंत येऊन ठेपला. यामुळे लागवड, बियाणे, खते, औषधी, मशागत तसेच मेहनत याचा हिशोब केल्यानंतर शेतकऱ्यांची अर्थव्यवस्था ढासळली आहे.
कोट
यावर्षी मी अद्रकची लागवड केली होती. पीक चांगले आले. अद्रकचे वजनही चांगले भरले. मात्र, अपेक्षित भाव न मिळाल्याने नुकसान झाले आहे.
-ज्ञानेश्वर पायगव्हाण, शेतकरी.
गतवर्षी अद्रकचे उत्पन्न व भावही चांगला मिळाल्याने यावर्षी अद्रकची जास्त लागवड केली. खर्चही खूप झाला. मात्र, भाव कोलमडल्याने नुकसान झाले आहे.
- स्वप्नील पवार, शेतकरी.
फोटो ओळ : आळंद परिसरात मोठ्या प्रमाणावर अद्रक काढणीचे काम सुरू आहे.