शेतकऱ्यांची ‘वाट’ चिखलातून; पाणंद रस्त्यांच्या १२२० कामांना कार्यारंभ, सुरू फक्त ४६३!
By विजय सरवदे | Published: April 21, 2023 07:24 PM2023-04-21T19:24:18+5:302023-04-21T19:24:34+5:30
देशाला स्वातंत्र्य मिळून तब्बल ७५ वर्षे उलटली तरी आजही शेतकऱ्यांना चिखलातूनच वाट काढावी लागत आहे, हे दुर्दैवच म्हणावे लागेल.
छत्रपती संभाजीनगर : गावागावात शेत रस्ते, पाणंद रस्ते तयार करण्यासाठी ‘मातोश्री ग्राम समृद्धी शेत पाणंद रस्ते योजना’ राबविण्यात येत आहे. या योजनेंतर्गत जिल्ह्यात २ हजार ४६९ कामांना मंजुरी मिळाली आहे. त्यातील १५३४ कामे ग्रामपंचायत, तर ७७६ कामे तहसील यंत्रणेमार्फत करण्यास ग्रामसभेने मान्यता दिली असून, सद्य:स्थितीत ग्रामपंचायतींकडून ४४९, तर तहसील यंत्रणांकडून १४ कामे सुरू झाली आहेत.
देशाला स्वातंत्र्य मिळून तब्बल ७५ वर्षे उलटली तरी आजही शेतकऱ्यांना चिखलातूनच वाट काढावी लागत आहे, हे दुर्दैवच म्हणावे लागेल. शेतकऱ्यांची ही अडचण सोडविण्याचा निर्णय घेत यासाठी निधी उपलब्ध करून दिला आहे. मातोश्री पाणंद रस्ते योजना मनरेगांतर्गत मजुरी व प्रति १ किमी रस्त्याला १०० तास जेसीबी यंत्र वापरणे, तसेच खडीकरण, रस्ते मजबुतीकरण, सीडीवर्क अशी योजना राबविण्यास हिरवा कंदिल दाखविला आहे. मात्र, जिल्ह्यात ही योजना संथगतीने सुरू असल्याचे चित्र आहे.
पावसाळ्याच्या आधी तरी कामे होणार का
ग्रामीण भागात मुख्य रस्त्यांची दुरवस्था आहे. मग, पाणंद रस्त्यांविषयी तर बोललेले न बरे! अशी प्रतिक्रिया शेतकऱ्यांची आहे. शेतीकडे जाण्यासाठी चांगला रस्ता नसल्यामुळे शेतीमालाची वाहतूक, तसेच शेतात अत्याधुनिक यंत्रे घेऊन जाण्याची मोठी अडचण आहे. ९ पैकी ३ तालुके सोडले, तर अजूनही तहसील यंत्रणेकडे असलेल्या पाणंद रस्त्यांच्या कामाला सुरुवात झालेली नाही. पावसाळ्याच्या आधी ती कामे सुरू करावीत, अशी अपेक्षा शेतकऱ्यांनी व्यक्त केली आहे.
कोणत्या तालुक्यात काय स्थिती?
तालुका- प्राशासकीय मान्यता- कार्यारंभ- सुरू
औरंगाबाद : २२२- २२२- ६९
फुलंब्री- ७७- ७१- ४३
सिल्लोड- ८५- ८५- ४४
सोयगाव- २२- २२- १६
कन्नड- २१४- २१४- ६८
खुलताबाद- २८- २८- १९
गंगापूर-२३४- २३४- ४४
वैजापूर- १०३- १०३- ४८
पैठण- २४१- २४१- १०५
२४६९ शेत रस्ता कामांना मंजुरी
‘मातोश्री ग्राम समृद्धी शेत पाणंद रस्ते योजने’अंतर्गत जिल्ह्यात २ हजार ४६९ कामांना मंजुरी मिळाली आहे.
१२२६ कामांना प्रशासकीय मान्यता
या योजनेंतर्गत जिल्ह्यात १ हजार २२६ कामांना प्रशासकीय मंजुरी मिळाली आहे.
१२२० कामांना कार्यारंभ, सुरू केवळ ४६३
ग्रामपंचायत यंत्रणेने रस्त्यांच्या १२०६ कामांना, तर तहसील यंत्रणेने १४ कामांची स्थळपाहणी करून कार्यारंभ आदेश दिले आहेत.