नियमित कर्ज भरणाऱ्या शेतकऱ्यांना प्रोत्साहनपर अनुदान मिळेना
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 19, 2021 04:05 AM2021-03-19T04:05:32+5:302021-03-19T04:05:32+5:30
पिंपळदरी : राज्य शासनाने दोन लाखापर्यंत थकीत कर्ज असणाऱ्या शेतकऱ्यांसाठी कर्जमाफीची घोषणा केली होती. त्यात नियमित कर्जाची परतफेड करणाऱ्या ...
पिंपळदरी : राज्य शासनाने दोन लाखापर्यंत थकीत कर्ज असणाऱ्या शेतकऱ्यांसाठी कर्जमाफीची घोषणा केली होती. त्यात नियमित कर्जाची परतफेड करणाऱ्या शेतकऱ्यांना शासनाने ५० हजारांचे प्रोत्साहनपर अनुदान देणार असल्याची घोषणा केली होती. या घोषणेला दीड वर्ष उलटूनही नियमित कर्जाची परतफेड करणाऱ्या शेतकऱ्यांना अद्यापही प्रोत्साहनपर अनुदानाची प्रतीक्षाच आहे.
सिल्लोड तालुक्यातील शेतकरी कायम अतिवृष्टी, तर कधी दुष्काळाच्या दुष्टचक्रात सापडला आहे. त्यानंतर आघाडी सरकारची सत्ता स्थापन झाल्यानंतर सरसकट कर्जमाफी मिळेल अशी आशा निर्माण झाली होती. मात्र, शासनाने सप्टेंबर २०१९ पर्यंत दोन लाख रुपये थकीत कर्ज असलेल्या शेतकऱ्यांसाठी कर्जमाफीची घोषणा केली. त्यामुळे नियमित कर्जाची परतफेड करणाऱ्या शेतकऱ्यांच्या पदरी निराशाच आली. पिंपळदरी गावातील नियमित कर्ज परतफेड करणारे जिल्हा मध्यवर्ती बँकेत १६२ व बँक ऑफ इंडियामध्ये ६८ शेतकरी आहेत. या शेतकऱ्यांनी दरवर्षी मुदतीत कर्जाची परतफेड केली आहे. या शेतकऱ्यांना शासनाने घोषित केलेल्या प्रोत्साहनपर अनुदानाचा एक रुपयाही मिळालेला नाही. अद्यापही हे शेतकरी वंचित अनुदानाची प्रतीक्षा करीत आहेत. शासनाची घोषणा हवेतच विरली की काय, असा प्रश्न शेतकऱ्यांना पडू लागला आहे.