दिलासादायक! पाचोड येथे जूनपासून शेतकऱ्यांना मिळणार मोसंबी हाताळणी केंद्राचा लाभ
By बापू सोळुंके | Published: May 2, 2024 07:38 PM2024-05-02T19:38:43+5:302024-05-02T19:40:28+5:30
पैठण तालुक्यात आणि विशेषत: पाचोड परिसरात मोठ्या प्रमाणात मोसंबीची लागवड होते.
छत्रपती संभाजीनगर : राज्य सरकारने मॅगनेट प्रकल्पांतर्गत राज्य कृषी पणन महासंघाने एशियन बँकेच्या सहकार्याने पाचोड येथे फळे व भाजीपाला हाताळणी सुविधा केंद्र उभारले आहे. पाचोड परिसरातील मोसंबी उत्पादक शेतकऱ्यांसाठी जूनपासून हे केंद्र खुले होणार आहे.
पैठण तालुक्यात आणि विशेषत: पाचोड परिसरात मोठ्या प्रमाणात मोसंबीची लागवड होते. या पार्श्वभूमीवर मोसंबी निर्यात सुविधा केंद्र पाचोड येथे असावे, अशी शेतकऱ्यांची मागणी होती. या मागणीची दखल घेत शासनामार्फत सुमारे दोन वर्षांपूर्वी पाचोड येथील उपबाजार समितीच्या आवारात दोन एकरवर फळे व भाजीपाला हाताळणी सुविधा केंद्र उभारण्याचा निर्णय पणन महामंडळाने घेतला.
एशियन डेव्हल्पमेंट बँक आणि राज्य शासनाच्या महाराष्ट्र ॲग्री बिझनेस नेटवर्क यांच्या संयुक्त विद्यमाने (मॅगनेट) प्रकल्पांसाठी १३ कोटी २४ लाख ४० हजार रुपये निधी उपलब्ध केला होता. या प्रकल्पाचे काम पूर्णत्वाकडे असून, जूनपासून हे केंद्र शेतकऱ्यांसाठी उपलब्ध होणार असल्याची माहिती पणन महासंघाचे अरूण नागरे पाटील यांनी दिली.
कोणत्या सुविधा उपलब्ध :
ग्रेडिंग सेंटर - मोसंबीची विगतवारी करण्यासाठी ग्रेडिंग लाइनवर प्रति तास १५ मेट्रिक टन क्षमता.
प्री कुलिंग - शेतमालाचे तापमान करण्यासाठी ६ मेट्रिक टन प्रति बॅच सुविधा (सहा तास प्रति बॅच)
कोल्ड स्टोअरेज - शेतमाल काही दिवस टिकवून ठेवण्यासाठी २५ मेट्रिक टनाचे ४ चेंबर एकूण क्षमता १०० मेट्रिक टन. पॅक हाऊस - शेतमालाचे ग्रेडिंग आणि पॅकिंग करण्यासाठी ८ हजार ८२३ चौरस फुटाचा हॉल.
यंत्र सामग्री आणि अन्य आवश्यक सुविधा - ६० मेट्रिक टन क्षमतेचा भुईकाटा, कार्यालय, स्टोअर, संरक्षक भिंत असलेली आधुनिक सुविधा.