गतवर्षीच्या संततधार, अवकाळीची शेतकऱ्यांना मिळणार आठ दिवसांत भरपाई
By बापू सोळुंके | Published: September 1, 2023 07:02 PM2023-09-01T19:02:04+5:302023-09-01T19:03:06+5:30
माजी आ. हर्षवर्धन जाधव यांचे ठिय्या आंदोलन: विमा कंपनी आणि जिल्हा कृषी अधीक्षकांनी दिले लेखी आश्वासन
छत्रपती संभाजीनगर: गतवर्षी संततदार पाऊस आणि अवकाळी पावसामुळे खरीप पिकांचे प्रचंड नुकसान झाले. मात्र विमा कंपनीने नुकसानभरपाई न दिल्याने कन्नडचे माजी आमदार हर्षवर्धन जाधव यांनी जिल्हा कृषीअधीक्षक कार्यालयात ठिय्या देताच, कृषी अधीक्षक आणि विमा कंपनी प्रतिनिधीने शेतकऱ्यांच्या बँक खात्यात आठ दिवसांत नुकसानभरपाई जमा करण्याचे लेखी आश्वासन दिले.
यावर्षी अत्यल्प पावसामुळे संपूर्ण मराठवाडा दुष्काळाच्या उंबरठ्यावर आहेत. मुसळधार पाऊस न पडल्यामुळे नदी,नाले कोरडे पडलेले आहेत. अशा परिस्थितीत संपूर्ण शेतकरी चिंतीत आहेत. गतवर्षी संततधार पाऊस आणि अतिवृष्टीमुळे औरंगाबाद जिल्ह्यातील पिकाची अंती पैसेेवारी ५० पैसेपेक्षा कमी असल्याचा अंतिम पीक कापण अहवाल डिसेंबर २०२२मध्ये प्रशासनाने दिला होता. याअहवालाच्या आधारे पीक विमा कंपनीने तात्काळ शेतकऱ्यांना खरीप हंगामाची नुकसानभरपाई देणे आवश्यक होते.मात्र अद्याप शेतकऱ्यांना विमा कंपनीने नुकसानभरपाई दिली नव्हती. याप्रश्नावर माजी आ. हर्षवर्धन जाधव यांनी शुक्रवारी दुपारी 2 ते सायंकाळी साडेपाच वाजेपर्यंत जिल्हा कृषी अधीक्षक प्रकाश देशमुख यांच्या कार्यालयात ठिय्या आंदोलन केले. सुमारे दोन तास ठिय्या दिल्यानंतर जिल्हा कृषी अधीक्षक प्रकाश देशमुख आणि विमा कंपनीच्या प्रतिनिधी पी.आर. कांबळे यांनी आठ दिवसांत शेतकऱ्यांच्या खात्यात नुकसानभरपाईची रक्कम जमा करण्याचे लेखी आश्वासन दिले. सायंकाळी साडेपाच वाजेपर्यंत आंदोलन सुरूच होते.
जिल्ह्यातील ६०टक्केच शेतकऱ्यांनाच नुकसानभरपाई का?
डिसेंबर २०२२मध्ये प्रशासनाने दिलेल्या अहवालानुसार जिल्ह्याची पीक पैसेवारी ५० पैसेेपेक्षा कमी आहे. असे असताना प्रशासनाने एकूण पीक पेऱ्यांच्या ६० टक्केच क्षेत्रावरील पिकांना नुकसानभरपाई का देऊ केली, असा सवाल कृषी अधीक्षकांना केला. तेव्हा या प्रश्नाचे उत्तर कृषी अधीक्षक यांना देता आले नाही. शेवटी त्यांनी शंभर टक्के शेतकऱ्यांना नुकसानभरपाई मिळणे अपेक्षित आहे, याबाबतची कार्यवाही करण्याचे पत्रही कृषी अधीक्षकांनी जाधव यांना दिले.