महाडीबीटी बियाणांची शेतकऱ्यांना करावी लागणार प्रतीक्षा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 4, 2021 04:05 AM2021-06-04T04:05:27+5:302021-06-04T04:05:27+5:30
सोयगाव : खरिपाच्या हंगामासाठी शेतकऱ्यांना अनुदान तत्त्वावर बियाणे वितरणासाठी राष्ट्रीय अन्न सुरक्षा अभियानांतर्गत तालुक्यात मका पिकासाठी २०० हेक्टर व ...
सोयगाव : खरिपाच्या हंगामासाठी शेतकऱ्यांना अनुदान तत्त्वावर बियाणे वितरणासाठी राष्ट्रीय अन्न सुरक्षा अभियानांतर्गत तालुक्यात मका पिकासाठी २०० हेक्टर व सोेयाबीन व तूर या पिकांसाठी प्रत्येकी २० हेक्टरचे पाच प्रकल्प हाती घेण्यात आले. या योजनेंतर्गत तालुक्यात १२८९ शेतकऱ्यांनी ऑनलाइन विविध वाणांच्या बियाणांसाठी नोंदणी केली आहे; परंतु अद्यापही या योजनेच्या सोडतीचा मुहूर्त निघाला नसल्याने शेतकऱ्यांना बियाण्यांची प्रतीक्षा करावी लागणार आहे.
खरिपाच्या हंगामाची चाहूल सुरू झालेली आहे. आवश्यक असलेल्या बियाणांची खरेदी शेतकऱ्यांकडून करण्यात आली आहे; परंतु बियाणांसाठी ऑनलाइन नोंदणी केलेल्या तालुक्यातील शेतकऱ्यांना प्रतीक्षा करावी लागणार आहे. योजनेतील बियाणांची सोडत पुणे येथे होणार आहे; परंतु सोडत नेमकी कधी होणार हा प्रश्न अनुत्तरितच असल्याने शेतकऱ्यांमध्ये चिंता लागलेली आहे. परिणामी नोंदणी केलेल्या काही शेतकऱ्यांनी बियाण्यांची प्रतीक्षा न करता थेट कृषी केंद्रांवरून बियाणे खरेदी करण्याची घाई सुरू केली आहे.
--
कृषी विभागाकडे बियाणे उपलब्धच नाही
पुणे येथील सोडत तर दूरच; परंतु योजनेच्या पूर्वतयारीसाठी तालुका कृषी विभागाकडे बियाणेच उपलब्ध नसल्याची माहिती विश्वसनीय सूत्रांनी दिली. त्यामुळे सोडत यादीत नाव समाविष्ट असलेल्या शेतकऱ्यांना संबंधित कृषी केंद्र चालकांकडे पाठविले जाईल. त्या कृषी केंद्राकडून बियाणे उपलब्ध करून देण्यात येणार आहे, असेही कृषी विभागाकडून सांगण्यात आले. परिणामी शासनाची बियाणे योजना कुचकामी ठरू शकते, असे चित्र सध्यातरी आहे.