..तर शेतकरी सरकारला वाऱ्यावर सोडतील
By Admin | Published: June 18, 2017 12:40 AM2017-06-18T00:40:01+5:302017-06-18T00:42:51+5:30
बीड :वापसा उडून गेला तर सरकारचे काही खरे नाही, असा इशारा माजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी कायकर्ता मेळाव्यात दिला.
लोकमत न्यूज नेटवर्क
बीड : सरसकट कर्जमाफीबद्दल भाजप- शिवसेनेने टाळाटाळ केली, शेतकरी वाऱ्यावर सोडला तर शेतकरी सरकारला वाऱ्यावर सोडतील, वापसा उडून गेला तर सरकारचे काही खरे नाही, असा इशारा माजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी कायकर्ता मेळाव्यात दिला.
अजित पवार म्हणाले, शेतकऱ्यांना सरसकट कर्जमाफी मिळावी ही भूमिका राष्ट्रवादीने घेतली. शेतकरी विरोधी भूमिका सरकारने घेतली. परंतु, शेतकऱ्यांनी संप पुकारल्यानंतर सरकारला जाग आली. कर्जमाफीबद्दल वेगवेगळे निकष लावून शब्दच्छल केला तर राष्ट्रवादी कॉँग्रेस पुन्हा सरकारच्या विरोधात आवाज उठविण्याचे काम करील, असा इशारा पवार यांनी दिला. खरिपाचा हंगाम सुरु झाला आहे. शेतकऱ्यांना बियाणे- खते खरेदी करायची आहे. परंतु, कर्जमाफीची दहा हजारांची मदत देताना निकष का लावले जात आहेत, असा सवाल पवार यांनी केला.
शेतकऱ्याच्या मुलाने उदरनिर्वाहासाठी लहान व्यवसाय सुरु केला असेल किंवा शेतीकामासाठी चारचाकी वाहन घेतले असेल तर त्याची चूक काय? सातवा वेतन आयोग देताना आमचा विरोध नाही परंतु, कर्जमाफीत शेतकऱ्यांसाठी जाचक अटी का असा सवाल करुन मोठे शेतकरी बाजूला ठेवा, लहान वाहने वापरणारा, लहान व्यवसाय करणारा, ज्याला मदतीची गरज आहे त्याला अडवू नका. वेळेवर दहा हजारांची मदत करा, असे पवार या वेळी म्हणाले.
प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे म्हणाले, राष्ट्रवादीने १८ वर्ष पूर्ण केली, १९ व्या वर्षात वाटचाल करताना हे वर्ष बळीराजाला समर्पित केले, राज्य सरकारने कर्जमाफी सुखासुखी दिली नाही. सरकारने कर्जमाफीबाबत राष्ट्रवादी कॉँग्रेसने आग्रही भूमिका घेतली. विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे यांनी विधान परिषदेत तर आमदारांनी विधानसभेत केली. वेळ पडल्यास हाती रुमणं घेण्याची भूमिका राष्ट्रवादीने मांडली असे तटकरे म्हणाले. संयोजक संदीप क्षीरसागर यांनी प्रास्ताविक भाषण केले.