देखाव्यातून दर्शविली शेती, पाण्याची अवस्था
By Admin | Published: April 20, 2016 12:31 AM2016-04-20T00:31:49+5:302016-04-20T00:47:58+5:30
औरंगाबाद : पावसाच्या अवकृपेने मराठवाडा दुष्काळाच्या वणव्यात होरपळत आहे.
औरंगाबाद : पावसाच्या अवकृपेने मराठवाडा दुष्काळाच्या वणव्यात होरपळत आहे. अशा भयंकर परिस्थितीत जगण्याची उमेदच गमावून बसलेल्या दुष्काळग्रस्त शेतकऱ्याची परिस्थिती पाहून मंगळवारी हजारो लोकांच्या डोळ्यांत अश्रू आले. भगवान महावीर जयंतीनिमित्त मंगळवारी काढण्यात आलेल्या शोभायात्रेत वर्धमान रेसिडेन्सी परिवारातर्फे चिमुकल्यांनी सादर केलेल्या देखाव्याने सर्वांचे मन हेलावून टाकले.
हा देखावा सादर करण्यासाठी गेले काही दिवस १९ मुला-मुलींनी मोठे परिश्रम घेतले. दुष्काळ आणि पाणीटंचाईच्या या काळात चिमुकल्यांनी पाणी बचतीचा संदेश देण्याबरोबर शेतकऱ्यांच्या आयुष्यातील या घटनांवर देखाव्यातून एक प्रकारे भाष्यच केले. शेतात काम करताना बैल मेल्यानंतर स्वत:च नांगराला जुंपणारा शेतकरी, निसर्गाच्या लहरीपणामुळे कर्जात अडकणारा शेतकरी आणि या सगळ्यातून शेवटी गळ्याभोवती दोरखंड आवळणारा शेतकरी, असे हृदयाला भिडणारे विविध क्षण पाहताना प्रत्येक जण काही क्षणांसाठी भावुक होऊन गेला.
शेतकऱ्याला जगण्याची उमेद देण्यासह वृक्षतोड टाळणे, पाणी वाचवा, असे विविध संदेशही चिमुकल्यांनी आपल्या सादरीकरणातून समर्पकपणे दिले. सकल जैन समाजाचे अध्यक्ष राजेंद्र दर्डा यांनी कौतुक करीत चिमुकल्यांचा सन्मान केला. देखाव्यासाठी रोहित महाजन यांनी परिश्रम घेतले.
नऊवार, डोक्यावर कलश
शोभायात्रेत चंद्रप्रभू खंडेलवाल दिगंबर जैन मंदिरांतर्गत महिला मंडळातील सर्व महिला नऊवार नेसून आल्या होत्या. डोक्यावर कलश घेऊन महिला भजन गात पुढे जात होत्या. बालाजीनगरातील कल्पतरू कुं थूनाथ जैन मंदिराच्या वतीने फेटे बांधून शोभायात्रेत सहभागी झाले होते. तसेच नमोकार भक्ती मंडळाचे अॅड. यतीन ठोले, राजकुमार पांडे, संतोष मुगदिया, नीलेश पहाडे, मयूर ठोले, विशाल ठोले. गुरू मिश्री युवा मंडळाचे कुंतिलाल हिरण, स्वप्नील पारख, स्वप्नील सकलेचा, संदीप खिंवसरा, अजिंक्य संघवी, सागर ब्रह्मेचा, मयूर बोथरा. शांती ग्रुपचे महेंद्र बंब, विशाल कांकरिया, रोहित छाजेड, हितेश कांकरिया, मनोज शिगवी, अजिंक्य शिंगवी, शुभम शिंगवी, अमित काला. जैन इंजिनिअरिंगचे अध्यक्ष नितीन बोरा, आनंद मिश्रीकोटकर, सुनील सेठी, राजेश पाटणी, कमल पहाडे, मुकेश ठोले, चेतन ठोले. जैन सोशल ग्रुपचे विपीन गुजराणी, राजेंद्र पगारिया, सुनील शिसोदिया, प्रशांत बिनायके, किशोर पांडे, नीरज बडजाते,अनुज दगडा. जैन अलर्ट ग्रुपचे अजित चंडालिया, नीलेश जैन, मनोज जैन. अरिहंत ग्रुपचे स्वप्नील पारख, सचिन बंब. अर्हम ग्रुपचे स्वाती मल्हारा, आकाश संकलेचा, नवदीप मरलेचा, शुभम बांठिया, निर्भय काठेड. परमेष्ठी ग्रुपचे प्रीतेश बोरा, किशोर सकलेचा, संतोष मुगदिया. मनोज छाबडा, अशोक गंगवाल, नरेंद्र अजमेरा, पीयूष कासलीवाल यांनीही सहभाग नोंदविला.
२४३ दात्यांनी केले रक्तदान
भगवान महावीर जयंतीनिमित्त स.भु. महाविद्यालयाच्या मैदानावर भगवान महावीर मेडिकल फाऊंडेशनतर्फे महारक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. सकाळी ११ वाजता महारक्तदान शिबिरास प्रारंभ झाला. या शिबिरात समाजबांधवांनी उत्स्फूर्तपणे सहभाग नोंदविला.
शिबिरात रक्तदान करण्यासाठी युवक, महिला व युवतींनीही मोठा सहभाग नोंदविला. रक्तदान हे श्रेष्ठ दान असून रक्तदानाद्वारे एखाद्याचा प्राण वाचू शकतो. त्यातूनच शिबिरात २४३ दात्यांनी रक्तदान करून समाजसेवेचे अनुपम दर्शन घडविले.
घाटी रुग्णालय येथील विभागीय रक्तपेढी, दत्ताजी भाले रक्तपेढी, औरंगाबाद रक्तपेढी, सेठ नंदलाल धूत हॉस्पिटल रक्तपेढी, अमृता रक्तपेढी, लोकमान्य रक्तपेढी, लायन्स रक्तपेढी, अर्पण व्हॅलेंटरी रक्तपेढी आदी रक्तपेढ्यांचे डॉक्टर आणि कर्मचारी याप्रसंगी उपस्थित होते.
शिबिराच्या यशस्वीतेसाठी डॉ. तुषार चुडीवाल, डॉ. शैलेश चांदीवाल, डॉ. ईश्वर ललवाणी, डॉ. सुभाष लुनावत, डॉ. प्रफुल्ल संचेती, डॉ. नरेंद्र खटोड, डॉ. सुशील बोरा आदींनी सहकार्य केले. तसेच अर्हम युवा सेवा ग्रुपच्या वतीने थॅलेसेमिया तपासणी शिबिराचे आयोजन केले होते.
यावेळी थॅलेसेमियाविषयी जनजागृती करणारी चित्रफीत दाखविण्यात आली. यावेळी शिबिरात ३०० जणांची थॅलेसेमियाची तपासणी करण्यात आली. आयोजित केलेल्या या शिबिरातून ‘जिओ और जिने दो’चा संदेश देण्यात आला.