पंपहाउसमध्ये २४ तासांत तीनदा बिघाड; छत्रपती संभाजीनगरचा पाणीपुरवठा पुन्हा विस्कळीत
By मुजीब देवणीकर | Published: March 9, 2023 01:26 PM2023-03-09T13:26:38+5:302023-03-09T13:27:46+5:30
पाणीपुरवठा विस्कळीत झाल्यामुळे महापालिकेच्या पाणीपुरवठा विभागाने दिलगिरी व्यक्त केली.
छत्रपती संभाजीनगर : फारोळा येथील पंपहाउसमध्ये सोमवारी रात्री आणि मंगळवारी दुपारी तांत्रिक बिघाडामुळे शहराचा पाणीपुरवठा ठप्प झाला. होळीच्या दिवशीही नागरिकांना पाणी मिळाले नाही. त्यामुळे नागरिकांनी संताप व्यक्त केला. पाणीपुरवठा विभागाने काही भागात उशिराने, तर काही वसाहतींचा पाणीपुरवठा एक दिवस पुढे ढकलला.
सोमवारी रात्री ९ वाजता आणि रात्री ११ वाजता वादळी वाऱ्यासह जोरदार पावसामुळे फारोळा येथील विजेच्या सबस्टेशनमध्ये अचानक स्पार्किंग होऊन विद्युत पुरवठा खंडित झाला. दुरुस्तीनंतर पहाटे साडेतीन वाजता पाणीपुरवठा पूर्ववत झाला. साडेसहा तास पाणीपुरवठा बंद असल्याने, मंगळवारी होळीच्या दिवशी नागरिकांना पाणी कसे द्यावे, असा प्रश्न प्रशासनाला पडला. धुलिवंदनाच्या दिवशी अनेक वसाहतींना पाणी मिळाले नाही. त्यातच मंगळवारी दुपारी पुन्हा १२.४५ वाहता फारोळ्यातच विद्युत पुरवठा खंडित झाला. मे.चैतन्य इलेक्ट्रिकल या एजन्सीमार्फत नवीन पॅनल बसविण्यात आले. या कामासाठी ११ तास पाणीपुरवठा बंद ठेवावा लागला. या ११ तासात लिकेज दुरुस्तीचे काम मे.ट्रान्सडेल्टा कंपनीमार्फत करण्यात आले. त्यानंतर, मध्यरात्रीपासून पम्पिंग पूर्ववत करण्यात आली.
जलकुंभ रिकामे
फारोळा येथील पम्पिंग सुरू केल्यानंतर बुधवारी पहाटे ४ वाजता जलकुंभात पाणी आले. ज्या भागाला मंगळवारी पाणीपुरवठा झाला नाही, त्या भागाला बुधवारी दुपारनंतर पाणी दिले. अनेक वसाहतींना पाणीपुरवठा एक दिवसाने पुढे ढकलण्यात आला आहे. पाणीपुरवठा विस्कळीत झाल्यामुळे महापालिकेच्या पाणीपुरवठा विभागाने दिलगिरी व्यक्त केली.