Video: मनमोहक! दमदार पावसाने जगप्रसिद्ध वेरूळ लेणीतील धबधबा सुरू
By ऑनलाइन लोकमत | Published: July 5, 2023 06:31 PM2023-07-05T18:31:01+5:302023-07-05T18:31:23+5:30
पावसाळ्यात दौलताबाद घाट, खुलताबाद शासकीय विश्रामगृह, सुलीभंजन, म्हैसमाळ, वेरूळ आदी ठिकाणी निसर्ग सौंदर्याने नटलेली असतात.
- सुनील घोडके
खुलताबाद: जगप्रसिद्ध वेरूळ लेणीतील धबधबा आज दुपारी ३ वाजेपासून सुरू झाला आहे. लेणी क्रमांक २९ येथे हा धबधबा असून पर्यटकांच्या आकर्षणाचे ठिकाण आहे.
खुलताबाद तालुक्यात मंगळवारी रात्री जोरदार पाऊस झाला. त्यानंतर आज दुपारी म्हैसमाळ परिसरातही पाऊस झाल्याने जगप्रसिद्ध वेरूळ लेणीचा धबधबा सुरू झाला आहे. आकर्षणाचा केंद्र असल्याने पर्यटकांनी धबधबा बघण्यासाठी मोठी गर्दी केली. अनेकांनी या धबधब्यासोबत सेल्फी घेत फोटोसेशन केले.
वेरूळ लेणीचा धबधबा हा येळगंगा नदीवर असून ही नदी म्हैसमाळ येथून उगम पावते. म्हैसमाळ परिसरात जोरदार पाऊस झाल्यानंतर म्हैसमाळ येथील छोटे मोठे पाझर तलाव तुडूंब भरल्यानंतर हा धबधबा सुरू होतो. एकदा का धबधबा सुरू झाला की किमान चार पाच महिने तो धोधो वाहत असतो. वेरूळ लेणी बघण्यासाठी येणाऱ्या पर्यटकांना या धबधब्याचे मोठे आकर्षण असते.
छत्रपती संभाजीनगर: दमदार पावसाने जगप्रसिद्ध वेरूळ लेणीतील धबधबा सुरू pic.twitter.com/RONGiyGE8k
— Lokmat Chhatrapati Sambhajinagar (@milokmatabd) July 5, 2023
पावसाळ्यात छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यासह परजिल्ह्यातील पर्यटक मोठ्या संख्येने प्रसिद्ध पर्यटनस्थळ म्हैसमाळ येथे पावसाचा आनंद घेण्यासाठी येतात. त्यानंतर पर्यटक वेरूळ लेणी धबधबा पाहण्यासाठी मोठी गर्दी करतात. पावसाळ्यात दौलताबाद घाट, खुलताबाद शासकीय विश्रामगृह, सुलीभंजन, म्हैसमाळ, वेरूळ आदी ठिकाणी निसर्ग सौंदर्याने नटलेली असतात. येथे दरवर्षी पर्यटकांची मोठी गर्दी होते.