समृद्धी महामार्गावर 'फास्ट' टॅगद्वारे 'फास्ट' लूट; प्रवासानंतर होतेय चौपट रक्कम कपात
By विकास राऊत | Published: July 10, 2023 12:01 PM2023-07-10T12:01:21+5:302023-07-10T12:03:30+5:30
दररोज ६० ते ७० वाहनधारकांची दुप्पट ते चौपट रक्कम ऑनलाइन कपात होत आहे.
छत्रपती संभाजीनगर :समृद्धी महामार्ग ११ डिसेंबर २०२२ पासून वाहतुकीला खुला झाला असून तो मार्ग अपघातांच्या सत्रामुळे चर्चेत असतानाच आता टोलनाक्यांवरून होणाऱ्या लुटीचा सामना वाहनधारकांना करावा लागत आहे. फास्ट टॅग ही सुविधा टोलनाक्यावर वाहनांच्या रांगांपासून मुक्ती देण्यासाठी आणली, मात्र ही सुविधा डोकेदुखी ठरत असून वाहनधारकांची फास्ट लूट होत असल्याच्या तक्रारी वाढत आहेत.
दररोज ६० ते ७० वाहनधारकांची दुप्पट ते चौपट रक्कम ऑनलाइन कपात होत आहे. तर काही वाहनधारकांनी प्रवास केल्यानंतर दोन ते चार दिवसांनी रक्कम कपात होण्याचे प्रकार घडत आहेत. फास्ट टॅग व्यवस्थापनाकडे तक्रारी करूनही ऑनलाइन कपात झालेली रक्कम वाहनधारकांना परत मिळत नाही. रोज वाहनधारकांकडून लूट होत असेल तर ऑनलाइन व ऑफलाइन अशा दोन्ही सुविधा सर्व महामार्गावर मिळाव्यात, जेणेकरून वाहनधारकांची लूट होणार नाही, अशी मागणी होत आहे.
किती वाहने धावतात दररोज?
समृद्धी महामार्गावरून सर्व प्रकारची १२ हजार वाहने दररोज धावत आहेत. समृद्धी, सोलापूर-धुळे हायवेसह एनएचएआयच्या सर्व महामार्गावर फास्ट टॅगविना वाहनधारकांना प्रवास करता येत नाही.
असा आहे टोलचा दर...
समृद्धी महामार्गावर महामार्गावर लहान वाहनांना एक रुपये ६५ पैसे प्रत्येक किलोमीटरला टोल आकारला जातो. जड वाहनांना हलक्या वाहनांपेक्षा तीनपट अधिक टोल भरावा लागताे. हलक्या व्यावसायिक वाहनांसाठी (मिनी बस) दोन रुपये ७९ पैसे, बस- ट्रकसाठी पाच रुपये ८५ पैसे, अवजड यंत्रसामग्रीसाठी नऊ रुपये १८ पैसे, अतिअवजड वाहनासाठी ११ रुपये १७ पैसे प्रत्येक किलोमीटरला टोलदर आहे.
एमएसआरडीसी काय म्हणते?
टोलचा सर्व प्रकार हा फायनान्शियल मुद्दा आहे. मुंबईतून यावर नियंत्रण आहे. जास्तीचा टोल कापला गेल्याच्या तक्रारी येत आहेत. परंतु बँक खात्याशी निगडीत ही बाब आहे. नाक्यावर वाहन येताच जेव्हा स्वाईप केले जाते, तेव्हा फास्ट टॅग खात्यात रक्कम नसेल आणि पुन्हा रक्कम टाकल्यानंतर पूर्ण टोलची रक्कम कपात होते, असे एमएसआरडीसीला टोल व्यवस्थापनाकडून सांगण्यात येत आहे.
तक्रारकर्ते काय म्हणतात?
शहरातील डॉ. सतीश वैष्णव यांनी काही दिवसांपूर्वी समृद्धीवरून प्रवास केला. शिर्डी, माळीवाडा या ठिकाणांच्या इंटरजेंचवरून उतरताना त्यांच्या खात्यातून रक्कम कपात झाल्यानंतर काही दिवसांनी पुन्हा ७३० रुपये कपात झाल्याचा एसएमएस आला. त्यांनी टोलनाक्यावरून जाऊन विचारणा केली. त्यांना ऑनलाइन तक्रारीचा सल्ला देण्यात आला. स्थानिक फास्ट टॅग विक्रेत्याकडे ते गेले, त्याने तर रोज ६० ते ७० वाहनांबाबत असाच प्रकार होत असल्याचे सांगितले. डॉ. वैष्णव यांनी ऑनलाइन तक्रार केल्यावर त्यांना पुराव्याअभावी रक्कम परत मिळणार नाही, असे कळविण्यात आले. रोज ६० ते ७० वाहनांबाबत असा प्रकार होत असेल तर ही लूटच असल्याचा आरोप त्यांनी केला.