सहाव्या दिवशीही उपोषण सुरू
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 18, 2018 01:08 AM2018-06-18T01:08:57+5:302018-06-18T01:09:32+5:30
कुलगुरू डॉ. बी. ए. चोपडे यांच्यावर गैरकारभाराचा आरोप असल्यामुळे त्यांची समितीमार्फत चौकशी सुरू आहे. ही चौकशी सुरू असेपर्यंत कुलगुरूंना सक्तीच्या रजेवर पाठविण्यात यावे, या मागणीसाठी १२ जूनपासून मराठवाडा विकास कृती समितीतर्फे बेमुदत उपोषण सुरू आहे. सहाव्या दिवशीही उपोषण सुरू होते
लोकमत न्यूज नेटवर्क
औरंगाबाद : डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. बी. ए. चोपडे यांच्यावर गैरकारभाराचा आरोप असल्यामुळे त्यांची समितीमार्फत चौकशी सुरू आहे. ही चौकशी सुरू असेपर्यंत कुलगुरूंना सक्तीच्या रजेवर पाठविण्यात यावे, या मागणीसाठी १२ जूनपासून मराठवाडा विकास कृती समितीतर्फे बेमुदत उपोषण सुरू आहे. सहाव्या दिवशीही उपोषण सुरू होते. या उपोषणाला राष्ट्रवादीचे आमदार सतीश चव्हाण, रिपब्लिकन पार्टी आॅफ इंडिया (ए) पक्षाचे युवा मराठवाडा अध्यक्ष नागराज गायकवाड आदींनी भेट देत पाठिंबा जाहीर केला.
प्रा. दिगंबर गंगावणे, अॅड. मनोज सरीन, अॅड. शिरीष कांबळे, सुनील साबळे आदींनी विद्यापीठात उत्तरपत्रिकांचा घोटाळा, कुलगुरूंनी स्वत:च्या नावावर ४ कोटी रुपये वळती करणे, नियुक्त्यांच्या संदर्भातील अनियमितता आदींसह गैरव्यवहाराचा आरोप कुलगुरूंवर केला आहे. राज्य सरकारने नेमलेल्या समितीची चौकशी पूर्ण होईपर्यंत कुलगुरूंना सक्तीच्या रजेवर पाठवण्याची मागणी करीत प्रा. दिगंबर गंगावणे यांच्या नेतृत्वात (१२ जून) उपोषण सुरू आहे. शुक्रवारी रात्री अॅड. शिरीष कांबळे आणि सुनील साबळे यांची उपोषणामुळे प्रकृती खराब झाली. त्यांना त्वरित घाटीत हलवले आहे. त्यांच्याऐवजी आता अन्य दोघांनी या आंदोलनात उडी घेतली आहे. कुलगुरूंना सक्तीच्या रजेवर पाठविल्यानंतरच आंदोलन मागे घेऊ, असे गंगावणे यांनी ‘लोकमत’शी बोलताना स्पष्ट केले. आ. सतीश चव्हाण यांनी शनिवारी उपोषणकर्त्यांची भेट घेत पाठिंबा दिला. तसेच राज्यपालांची भेट घेऊन आंदोलकांच्या मागणीचा सहानुभूतिपूर्वक विचार करण्याची विनंती करणार असल्याचे आश्वासनही त्यांनी दिले. रिपाइंचे नागराज गायकवाड, संघटक लक्ष्मण हिवराळे, नितीन वाकेकर, सतीश गायकवाड, राकेश पंडित आदींनी रविवारी उपोषणकर्त्यांची भेट घेत पाठिंबा दिला.