तीर्थपुरी ग्रा.पं.ने गाळ्यांचा लिलाव न केल्याने उपोषण
By Admin | Published: May 12, 2017 12:25 AM2017-05-12T00:25:48+5:302017-05-12T00:29:21+5:30
तीर्थपुरी : येथील व्यापारी गाळ्यांचा लिलाव करण्याचा ठराव ग्रामपंचायतीने केला असतानाही त्या गाळ्यांचा लिलाव केला नाही. त्यामुळे कार्यकर्त्यांनी ग्रा.पं. समोर ११ मे रोजी उपोषण सुरू केले
लोकमत न्यूज नेटवर्क
तीर्थपुरी : येथील व्यापारी गाळ्यांचा लिलाव करण्याचा ठराव ग्रामपंचायतीने केला असतानाही त्या गाळ्यांचा लिलाव केला नाही. त्यामुळे तीर्थपुरी येथे गावातील कार्यकर्त्यांनी ग्रा.पं. समोर ११ मे रोजी उपोषण सुरू केले असून, जोपर्यंत लेखी आश्वासन मिळत नाही, तोपर्यंत उपोषण सोडले जाणार नाही, अशी भूमिका घेतली आहे.
तीर्थपुरी येथील ग्रामपंचायतच्या ग्राम सचिवालयातील नवीन बांधलेले दोन व्यापारी गाळे तसेच इतर १९ व्यापारी संकुलातील गाळ्यांची मुदत संपली असताना त्या सर्वच गाळ्यांचे लिलाव केले जाईल, असा ठराव घेण्यात आला होता. परंतु लिलाव न करता नवीन दोन गाळे ग्रामसचिवालयात इतरांना देण्यात आले असून, व्यापारी संकुलातील १९ गाळ्यांची मुदत संपली तरी त्याचाही लिलाव घेण्यात आला नाही. त्यामुळे ग्रामपंचायतीला लेखी तसेच पं.स.ला लेखी तक्रार केली. परंतु त्याकडे ग्रामविकास अधिकारी यांनी दुर्लक्ष केले. त्यामुळे लिलावाचे लेखी आश्वासन मिळत नाही तोपर्यंत उपोषण चालू राहणार असे उपोषणकर्ते श्रीहरी बोबडे,
अण्णासाहेब बोबडे, गणेश गवते, दिलीप मोरे, विठ्ठल बोबडे, तुकाराम बोबडे, राहुल चिमणे यांनी सांगितले.
यावेळी सरपंच शैलेंद्र पवार यांना विचारले असता त्यांनी सांगितले की, जे गावे वाटप केले ते नियमानुसार वाटप केले असून, त्यात कोणतीही मनमानी केलेली नाही. ग्रामविकास अधिकारी गजानन मुपडे यांना संपर्क करण्याचा प्रयत्न केले असता ते आलेले नव्हते. तसेच त्यांचा मोबाईल स्वीचआॅफ होता. उपोषणस्थळी पंचायत समितीचे माजी सभापती तात्यासाहेब चिमणे, रोहयो अध्यक्ष अंकुश बोबडे, ग्रामपंचायत सदस्य घनशाम चिमणे यांनी भेटी देऊन उपोषणकर्त्यांसोबत चर्चा केली. यावेळी ग्रामस्थांची मोठ्या संख्येने उपस्थित होते.