हे सकारात्मक भावनेने केलेले उपोषण; मुख्यमंत्री दखल घेतील : पंकजा मुंडे
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 27, 2020 04:49 PM2020-01-27T16:49:52+5:302020-01-27T16:50:39+5:30
मराठवाडयातील सिंचन प्रकल्प पूर्ण करण्याचे केले आवाहन
औरंगाबाद : लाक्षणिक उपोषण मराठवाड्याच्या पाणी प्रश्नांवर लक्षवेधून घेण्यासाठी सकारात्मक भावनेने केलेले होते, याची दखल मुख्यमंत्री उद्धव ठाकरे नक्की घेतील असा आशावाद माजी मंत्री पंकजा मुंडे यांनी व्यक्त केला. विभागीय आयुक्तालयासमोर सुरु असलेल्या एकदिवसीय लाक्षणिक उपोषणाच्या समारोपप्रसंगी त्या बोलत होत्या.
गोपीनाथ मुंडे प्रतीष्टानाच्या माध्यमातून मराठवाड्याचा पाणी प्रश्नांवर माजी मंत्री पंकजा मुंडे यांनी सोमवारी ( दि. २७ ) सकाळी ११ वाजेपासून विभागीय आयुक्तालयासमोर एक दिवसीय लाक्षणिक उपोषण केले. यावेळी व्यासपीठावर खासदार प्रीतम मुंडे, भाजपचे विधानपरिषद विरोधीपक्ष नेते प्रवीण दरेकर, माजी विधानसभा अध्यक्ष हरिभाऊ बागडे यांच्यासह मराठवाड्यातील भाजपचे आमदार, नेते यांची उपस्थिती होती. यावेळी पंकजा मुंडे म्हणाल्या की, मराठवाड्यातील प्रश्न गंभीर असून यावर तोडगा काढणे गरजेचे आहे. येथील शेतकऱ्याला पाणी उपलब्ध करून द्या, त्यांना कर्जमाफीचीही गरज पडणार नाही. ही लढाई हक्काच्या १७ टीएमसी पाण्यासाठी आहे. भाजप-सेना युतीच्या काळात मराठवाड्यासाठी अनेक जलसिंचन प्रकल्पांची आखणी करण्यात आली आहे. त्यासाठी आर्थिक तरतूदही केली आहे. आता ते प्रकल्प लवकर कसे पूर्ण होतील याची काळजी या सरकारला घेयाची आहे. मराठवाड्यातील कोणतेही सिंचन प्रकल्प बंद करू नका असे आवाहनही त्यांनी यावेळी केले.