समान दलितवस्ती निधीसाठी उपोषण
By Admin | Published: May 3, 2016 01:01 AM2016-05-03T01:01:33+5:302016-05-03T01:06:16+5:30
नांदेड : जिल्हा परिषदेच्या समाजकल्याण विभागाकडून होत असलेल्या दलितवस्ती विकास निधी वाटपात अनियमितता होत असल्याची तक्रार
नांदेड : जिल्हा परिषदेच्या समाजकल्याण विभागाकडून होत असलेल्या दलितवस्ती विकास निधी वाटपात अनियमितता होत असल्याची तक्रार समाजकल्याण समितीचे सदस्य रमेश सरोदे यांनी करत सोमवारी जिल्हा परिषदेपुढे उपोषण सुरू केले आहे़ निधी वाटपाची संपूर्ण प्रक्रियाच रद्द करण्याची मागणी त्यांनी केली़
जिल्ह्यातील अनुसूचित जाती व नवबौद्ध घटकांच्या वस्तींचा विकास करणे यासाठी दलितवस्ती सुधार योजनेअंतर्गत २०१५-१६ साठी जिल्हा परिषदेला ३२ कोटी रूपये निधी प्राप्त झाला आह़े मात्र या निधीचे नियोजन हे नियमाला धरून होत नसल्याची तक्रार सरोदे यांनी केली़ या निधीचे वाटप हे पदाधिकाऱ्यांनी स्वत:च्या मर्जीप्रमाणे करताना कोट्यवधीचा निधी स्वत: घेत सदस्यांची मात्र काही लाखांवर बोळवण केल्याचेही तक्रारीत त्यांनी नमूद केले़
एका समाजमंदिरासाठी लागणाऱ्या ५ लाखांचा निधी हा केवळ दीड लाखांवर आणला आहे़ त्यामुळे ही कामे पूर्ण होणार कशी असा प्रश्नही त्यांनी विचारला़ याबाबत अनेकदा पदाधिकारी व अधिकाऱ्यांनाही विचारणा केली असता समाधानकारक उत्तर न मिळाल्याने सरोदे यांनी जिल्हा परिषदेपुढे उपोषण सुरू केले़ या उपोषणास जिल्हा परिषदेच्या अनेक सदस्यांनी पाठींबा दिला आहे़
दरम्यान, या उपोषणास सोमवारी जिल्हा परिषदेचे पदाधिकारी, अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी पद्माकर केंद्रे, समाजकल्याण अधिकारी सुनील खमीतकर यांनी भेट देवून चर्चा केली़ मात्र सरोदे हे आपल्या भूमिकेवर ठाम राहिले़ विशेष म्हणजे समाजकल्याण समितीच्या बैठकीपूर्वी दलितवस्ती सुधार योजनेच्या कामाचे आॅर्डर काढावेत आणि मगच सभा घ्यावी अशी भूमिका घेतल्याने आॅर्डर निघाल्या़ पण त्यात अनेक सदस्यांच्या निधींची पळवापळवी झाल्याचे उघड झाले़ त्यामुळेच उपोषण केल्याचे ते म्हणाले़
दरम्यान, दलितवस्ती निधीतील अनियमिततेप्रकरणी जि़ प़ सदस्या डॉ़ मिनाक्षी कागडे यांनीही जिल्हाधिकाऱ्यांकडे तक्रार केली आहे़ तसेच भाजपाचे जिल्हाध्यक्ष राम पाटील रातोळीकर यांनीही या निधीचे फेरनियोजन करण्याची मागणी केली़