पक्षाच्या बैठकीहून परताना 'समृद्धी'वर भीषण अपघात; 'बसपा' जिल्हाध्यक्षासह दोघांचा मृत्यू
By ऑनलाइन लोकमत | Updated: December 5, 2024 12:27 IST2024-12-05T12:26:41+5:302024-12-05T12:27:10+5:30
विधानसभा निवडणुकीच्या निकालानंतर बसपाची समीक्षा बैठक मुंबईतील कार्यालयात मंगळवारी आयोजित केली होती.

पक्षाच्या बैठकीहून परताना 'समृद्धी'वर भीषण अपघात; 'बसपा' जिल्हाध्यक्षासह दोघांचा मृत्यू
छत्रपती संभाजीनगर / सिन्नर (नाशिक) : विधानसभा निवडणुकीनंतर बहुजन समाज पार्टीच्या (बसपा) मुंबईत आयोजित समीक्षा बैठकीनंतर छत्रपती संभाजीनगरकडे परतणाऱ्या पदाधिकाऱ्यांच्या गाडीला समृद्धी महामार्गावर भीषण अपघात झाला. त्यात दोघांचा मृत्यू झाला, तर चौघे जण जखमी झाले. ही घटना नाशिक जिल्ह्यातील सिन्नर तालुक्यातील गोंदे इंटरचेंजजवळ समृद्धी महामार्गावर बुधवारी पहाटे चारच्या सुमारास घडली.
सचिन सुभाष बनसोडे (रा. इंदिरानगर, गारखेडा परिसर) आणि प्रशांत सुनील निकाळजे (रा. संजयनगर, मुकुंदवाडी) अशी अपघातात मृत्यू झालेल्या पदाधिकाऱ्यांची नावे आहेत. विधानसभा निवडणुकीच्या निकालानंतर बसपाची समीक्षा बैठक मुंबईतील कार्यालयात मंगळवारी आयोजित केली होती. या बैठकीला छत्रपती संभाजीनगरचे बसपा जिल्हाध्यक्ष सचिन बनसोडे यांच्यासह इतर चार वाहने गेली होती. सायंकाळी बैठक संपल्यानंतर बसपा पदाधिकारी समृद्धी महामार्गावरून छत्रपती संभाजीनगरच्या येत होते. त्यात मारुती सुझुकी कंपनीची एक्सएल सिक्स कार (एमएच २० जीक्यू ८५१५) कंटेनर (एचआर ३८ एसी ३०९५) वर मागून धडकली. अपघात एवढा भीषण होता की, कारचा समोरील भाग चक्काचूर झाला. सचिन बनसोडे यांचा जागीच मृत्यू झाला. कारमधील प्रशांत निकाळजे शुभम दसारे (२५, रा. पुंडलिकनगर), सचिन मनोहर साळवे (२५, रा. बंबाटनगर), शुभम दांडगे (२६, रा. जवाहर कॉलनी) आणि अनिल मनोहर (२९) हे गंभीर जखमी झाले. या सर्वांना सिन्नर येथील उपजिल्हा रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले. उपचार सुरू असताना प्रशांत निकाळजे यांचा मृत्यू झाला. उर्वरित चार जणांना नाशिक येथील रुग्णालयात हलविण्यात आले आहे.
सिंदखेडराजा येथे पकडला कंटेनर
अपघाताची घटना घडल्यानंतर घटनास्थळावर पोलिसांना कंटेनरची नंबर प्लेट आढळून आली. त्याआधारे समृद्धी महामार्गावरील सर्व टोल प्लाझांना त्याची माहिती देण्यात आली. वावीचे सहायक पोलिस निरीक्षक गणेश शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली हवालदार अजय महाजन, किरण पवार, नवनाथ आडके कंटेनरच्या शोधासाठी खासगी वाहनातून जालन्याच्या दिशेने रवाना झाले. सदरचा कंटेनर सिंदखेडराजा येथे स्थानिक पोलिसांच्या मदतीने पकडण्यात आला. यावेळी समृद्धी महामार्गाच्या कडेला चालक स्वयंपाक करताना सापडला.
प्रचंड जनसमुदायाच्या उपस्थितीत अंत्यसंस्कार
बहुजन समाज पार्टीचे जिल्हाध्यक्ष सचिन बनसोडे व त्यांचा मेहुणा प्रशांत निकाळजे यांच्यावर बुधवारी दुपारी प्रचंड जनसमुदायाच्या उपस्थितीत गादिया विहार स्मशानभूमीत अंत्यसंस्कार करण्यात आले. सचिन बनसोडे हे गादिया विहार भागातच राहत होते; तर प्रशांत निकाळजे हे मुकुंदवाडीत राहत होते. सचिनच्या पश्चात वडील, एक भाऊ, पत्नी शीतल बनसोडे, मुलगी असा परिवार आहे. शीतल बनसोडे यांनी औरंगाबाद पूर्वमधून विधानसभा लढवली होती. शीतल बनसोडे यांचे प्रशांत निकाळजे हे सख्खे भाऊ होत. प्रशांत निकाळजे हेही बसपामध्येच कार्यरत होते. त्यांच्या पश्चात आई-वडील, पत्नी, मुलगी असा परिवार आहे.
आंबेडकरी चळवळीचे नुकसान
सचिन व प्रशांतच्या निधनाची बातमी वाऱ्यासारखी शहरात पसरली. बसपाचे प्रदेशाध्यक्ष सुनील डोंगरे हेही मुंबईहून आले होते. स्मशानभूमीत माजी उपमहापौर प्रकाश निकाळजे, शिंदेसेनेचे जिल्हाप्रमुख राजेंद्र जंजाळ, बंडू कांबळे व श्रावण गायकवाड यांनी शोकसंवेदना व्यक्त केल्या. आंबेडकरी चळवळीचा निष्ठावान कार्यकर्ता अशी सचिन बनसोडे यांची ओळख होती. चळवळीचे कोणतेही आंदोलन असो; पक्षाचा प्रोटोकॉल बाजूला सारून सचिन त्यात सहभागी होत असत. पक्षाशी एकनिष्ठ राहिल्याने त्यांना मोठमोठ्या जबाबदाऱ्या यशस्वीपणे पार पाडता आल्या. प्रदेश पातळीवरही त्यांनी जबाबदारी सांभाळली होती. गेली अनेक वर्षे ते बसपाचे जिल्हाध्यक्ष होते. प्रशांत निकाळजे आंंबेडकरी चळवळीत सदैव सक्रिय असत.