हॉटेलमध्ये जेवण्यावरून दोन पोलिसांवर जीवघेणा हल्ला, पडेगावातील घटना
By राम शिनगारे | Published: May 23, 2023 08:41 PM2023-05-23T20:41:35+5:302023-05-23T20:41:45+5:30
छावणी ठाण्यात परस्परविरोधी गुन्हा दाखल.
छत्रपती संभाजीनगर : पडेगावातील माऊली रेस्टॉरंटमध्ये मध्यरात्री १२ वाजेच्या सुमारास जेवण्यासाठी गेलेल्या उस्मानपुरा ठाण्यातील दोन पोलिसांना हॉटेल मालकासह कर्मचाऱ्यांनी बेदम मारहाण केली. त्यात दोन कर्मचारी गंभीर जखमी झाले आहेत. हॉटेलमधील स्वयपाकीनेही पोलिसांनी चाकू हल्ला केल्याचा दावा केला. या प्रकरणी परस्परविरोधी जिवघेणा हल्ला केल्याचा गुन्हा छावणी पोलिस ठाण्यात मंगळवारी (दि. २३) नोंदविण्यात आला.
छावणी ठाण्यात दाखल गुन्ह्यानुसार उस्मानपुरा पोलिस ठाण्यातील कर्मचारी सतीष जाधव (रा. द्वारकानगर, पडेगाव) व शशिकांत कंचार हे ठाण्यातुन ११.३० वाजेच्या घरी जाण्यासाठी निघाले होते. १२ वाजेच्या सुमारास त्यांना पडेगावातील माऊली रेस्टॉरंट उघडे दिसले. तेव्हा त्यांनी गाडी थांबवून जेवणासाठी जाण्याचा प्रयत्न केला. तेव्हा त्यांना प्रवेशद्वारावरच सुरक्षारक्षकाने जेवण मिळणार नाही, असे सांगितले. त्यावरून बाचाबाची सुरू झाली.
तेव्हा हॉटेल मालक संतोष आमलेच्या मुलाने आम्ही तुम्हालाच विकत घेऊ, आमच्या हॉटेलमध्ये तुमची जेवण्याची लायकी नाही, अशी भाषा वापरली. तेव्हा सतीष जाधव यांनी पोलिस नियंत्रण कक्षाला माहिती दिली. त्यानुसार छावणी पोलिसांची ११२ गाडी घटनास्थळी आली. तोपर्यंत हॉटेल मालकही घटनास्थळी दाखल झाला. संतोष आम्ले याच्यासह मुलगा आणि ७ ते ८ कर्मचाऱ्यांनी दोन्ही पोलिस कर्मचाऱ्यांना बेदम मारहाण केली.
यात दोघांचे डोळे, तोंड, पायवर लोखंडी रॉड, लाकडाच्या दांड्याने मारहाण केली. हा प्रकार ११२ च्या पोलिसांसमोर घडला. त्यानंतर पीटर मोबाईल गाडी आल्यानंतर गंभीर जखमी पोलिस कर्मचाऱ्यांना त्यानंतर घाटी उपचारासाठी दाखल करण्यात आले. या प्रकरणी सतीष जाधव यांच्या तक्रारीवरून संतोष आमले, त्याच्या मुलासह ७ ते ८ कर्मचाऱ्यांच्या विरोधात खूनाचा प्रयत्न केल्याचा गुन्हा नोंदवला. अधिक तपास सपोनि पांडुरंग भागिले करीत आहेत.
स्वायपाकीची पोलिसांच्या विरोधात तक्रार
माऊली रेस्टॉरंटमधील स्वयपाकी गोपीनाथ जाधव (रा. पडेगाव) यांनी दोन पोलिस कर्मचाऱ्यांच्या विरोधात तक्रार नोंदवली. या तक्रारीनुसार पोलिस कर्मचारी दारू पिऊन रात्री १२ वाजता हॉटेलमध्ये जेवण्यासाठी आले होते. त्यांना हॉटेल बंद झाल्याचे सांगितल्यानंतर त्यांनी शिविगाळ करीत चाकूने हल्ला केला. या वादात हॉटेल मालकाच्या मुलाचा महागडा मोबाईलही फोडल्याचे तक्रारी म्हटले आहे. अधिक तपास सपोनि. ज्ञानेश्वर अवघड करीत आहेत.