नगर महामार्गावरील रेल्वे उड्डाणपुलावर जीवघेणे खड्डे, लोखंडी सळ्या पडल्या उघड्या
By ऑनलाइन लोकमत | Published: September 10, 2024 08:14 PM2024-09-10T20:14:33+5:302024-09-10T20:14:56+5:30
अवघ्या सहा महिन्यात पुलावरील रस्त्याची दुरवस्था
- संतोष उगले
वाळूज महानगर : शहरातील नागरिक, उद्योजक आणि वाहनधारकांच्या मागील ४० वर्षांच्या मागणीनंतर अखेर अहमदनगर महामार्गावरील तिसगाव फाट्यालगत रेल्वे उड्डाणपूल उभारण्यात आला. परंतु अल्पावधीतच पुलावरील मार्गावर खड्डे पडून अक्षरशः लोखंडी सळ्या बाहेर पडल्या आहेत. जीवघेणे खड्डे व धोकादायक बनलेल्या मार्गावरून वाहनचालकांना ये-जा करावी लागत आहे.
नगर महामार्गावरील रेल्वे उड्डाणपुलावरील वाहतूक कोंडी फोडण्यासाठी आणि अपघाताचे प्रमाण कमी करण्यासाठी जुन्या रेल्वे उड्डाणपूल लगत पर्यायी उड्डाणपूल उभारावा यासाठी अनेक बैठका, निवेदन, आंदोलनातून अखेर १८ कोटी रूपये खर्चून उड्डाणपूल तयार करण्यात आला. वाहतुकीसाठी पुलावरील मार्ग मोकळा केल्यानंतर अवघ्या सहा महिन्यात खड्डे पडण्यास सुरूवात झाली. सार्वजनिक बांधकाम विभागातील जागतिक बँक प्रकल्प शाखेकडे या पुलाच्या देखभाल दुरुस्तीची जबाबदारी आहे. या विभागामार्फत पुलावरील रस्त्याची डागडुजी केली जात नसल्याने याठिकाणी खड्डेच खड्डे दिसून येतात.
गोलावाडी फाट्यापासून पुढे खड्डे
रेल्वे उड्डाणपुलाचा परिसर जागतिक बँक प्रकल्प, छत्रपती संभाजीनगरकडे येतो. तर, गोलवाडी ते इसारवाडी फाट्यापासून पुढे नगरपर्यंतचा मार्ग जागतिक बँक प्रकल्प अहमदनगर यांच्या अखत्यारित येतो. गोलवाडी फाट्यापासून तिरंगा चौक, कामगार चौक, वाळूज परिसर, लिंबेजळगाव, दहेगाव बंगला आणि त्यापुढे इसारवाडी फाट्यापासून नगर पर्यंत महामार्गावर अनेक ठिकाणी जीवघेणे खड्डे पडून रस्त्याची दुरवस्था झालेली आहे. याचा फटका मालवाहतूक करणारी वाहने, उद्योजक, ट्रान्सपोर्ट चालकांना बसत आहे.
मालाचे नुकसान, वेळेचा अपव्यय
वाळूज येथून तयार होणारे उत्पादन वाहनांद्वारे अहमदनगर, पुणे आदी ठिकाणी पाठवले जाते. वाळूज मधील उद्योगांसाठी सर्वाधिक वापर हा नगर महामार्गाचा होतो. परंतु रस्त्याची दुरवस्था झाल्याने वेळेत माल न पोहोचणे, तयार मालांचे व वाहनांचे नुकसान या समस्यांना सामोरे जावे लागत आहे.
- राजेश मानधनी, उद्योजक
दुरूस्तीचे काम सुरूच आहे
- दोन दिवसांपूर्वीच पाऊस उघडला. आता पुन्हा महामार्गावरील खड्डे बुजवण्याचे काम सुरू करण्यात आले आहे. सातत्याने लक्ष ठेवून खड्डे बुजवत आहोत.
- अनिल पाबळे, उपअभियंता, जागतिक बँक प्रकल्प, अहमदनगर
हे काम रेल्वे प्रशासनाचे
रेल्वे पुलावरील खड्ड्यातून स्टीलचे रॉड बाहेर आलेले दिसतात हे खरे आहे. ते काम रेल्वे प्रशासनाकडे येते. आमच्याकडे जो रस्ता येतो, त्यावरील खड्डे आम्ही बुजवले आहेत.
- विनोद जोशी, अभियंता, जागतिक बँक प्रकल्प