हॉटेलसमोर गाडी उभी केल्यामुळे पिता-पुत्राचा 'खाकी'वर हात
By राम शिनगारे | Published: November 3, 2022 06:18 PM2022-11-03T18:18:51+5:302022-11-03T18:21:21+5:30
हॉटेलचालक बापलेक आरोपी फरार झाले आहेत
औरंगाबाद : आमच्या हॉटेलसमोर पोलिसांची शासकीय गाडी उभी करू नका, असे म्हणत हॉटेलचालक पिता-पुत्राने चक्क चिकलठाणा पोलीस ठाण्यातील कर्मचाऱ्यास शिविगाळ करीत मारहाण केली. यात कर्मचाऱ्याचे कपडेही फाडण्यात आले. या प्रकरणी गुन्हा नोंदविण्यात आला असून, आरोपी फरार झाल्याची माहिती एमआयडीसी सिडको पोलिसांनी दिली.
मलखानसिंग सिताराम नागलोद असे मारहाणीत जखमी पोलीस कर्मचाऱ्याचे नाव आहे. नागलोद यांनी चिकलठाणा पोलीस ठाण्याच्या समोरील हॉटेल साईराम समोर रस्त्याच्या कडेला पोलिसांचे शासकीय वाहन उभे केले होते. तेव्हा हॉटेलचे मालक उमेश शिवालाल जैस्वाल व त्याचा मोठा मुलगा यांनी वाहन उभे करु नका, असे बजावले. तेव्हा नागलोद यांनी समजावून सांगण्याचा प्रयत्न केला असता, त्यांच्यासोबत बापलेकाने वाद सुरु केले. या वादातुनच दोघांनी नागलोद यांच्यावर हल्ला चढवला. त्यांची कॉलर पकडून शिविगाळ करीत मारहाण केली.
यात त्यांच्या शासकीय गणवेशाचे बटन तुटले, तसेच गणवेशावरील नेमप्लेटही तोडून टाकली. तसेच 'तुला याठिकाणी नोकरी करायची असेल तर नीट कर नाहीतर तुला बघुन घेईन' अशी धमकीही पोलीस कर्मचाऱ्यास दिली. यावरुन एमआयडीसी सिडको पोलीस ठाण्यात नागलोद यांच्या तक्रारीवरुन जैस्वाल बापलेकाच्या विरोधात शासकीय कामकाजात अडथळ्याचा गुन्हा नोंदविण्यात आला. अधिक तपास उपनिरीक्षक आत्माराम घुगे करीत आहेत.