स्वत:च्या अल्पवयीन मुलाकडून घरफोडी करून घेणारा बाप अटकेत
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 23, 2019 07:43 PM2019-11-23T19:43:06+5:302019-11-23T19:50:23+5:30
पोलिसांनी विधीसंघर्षग्रस्त मुलाला ताब्यात घेतले
औरंगाबाद: स्वत:च्या पंधरा वर्षाच्या मुलाकडून पैठण येथे घरफोडी करणाऱ्या बापाला स्थानिक गुन्हेशाखेने २३ नोव्हेंबर रोजी अटक केली. अटकेतील आरोपीकडून सोन्याचे दागिने विक्री करून आलेली २ लाख ८० हजाराची रोकड आणि ८० ग्रॅम सोन्याची लगड आणि ७ ग्रॅमचे दागिने असा सुमारे ६ लाख १८ हजार ८००रुपयांचा ऐवज जप्त केला.
रंगनाथ सुब्रमण्यम कस्तुरे(रा. कातपुर, ता. पैठण)असे अटकेतील आरोपीचे नाव आहे. याविषयी स्थानिक गुन्हेशाखेचे निरीक्षक भागवत फुंदे यांनी सांगितले की, कातपुर शिवारातील मुकुंद शांताराम जोशी हे सहकुटुंब भंडारदरा येथे १७ नोव्हेंबर रोजी गेले होते. १८ रोजी रात्री २ वाजता ते घरी परतले तेव्हा चोरट्यांनी घरफोडून ८ तोळ्याचे दागिने आणि रोख ४१ हजार रुपये चोरून नेल्याचे त्यांना दिसले. याविषयी त्यांनी पैठण एमआयडीसी पोलीस ठाण्यात तक्रार नोंदविली होती. तक्रार प्राप्त झाल्यानंतर स्थानिक गुन्हेशाखेच्या अधिकाऱ्यांनी तपास सुरू केला तेव्हा ही चोरी रंगनाथ कस्तुरे याने त्याच्या (विधीसंघर्षग्रस्त बालक)१५ वर्षीय मुलाकडून करून घेतल्याची माहिती खबऱ्याने पोलिसांना दिली.
पोलिसांनी संशयित आरोपी रंगनाथला त्याच्या घरातून उचलले तेव्हा त्याने स्वत:च्या मुलाकडून चोरी करून घेतल्याची कबुली दिली. घरफोडीतील सोन्याचे दागिने पैठण येथील एका दुकानदाराला २ लाख८० हजार रुपयांत विक्री केल्याचे सांगितले. तसेच त्यातील रोख ४० हजार रुपये आणि सात ग्रॅमचे दागिने मुलाकडे दिल्याचे सांगितले. यानंतर पोलिसांनी पैठण शहरातील त्या सोनाराचे दुकान गाठून दुकानदाराकडे चौकशी केली. तेव्हा त्याने आरोपीकडून दागिने खरेदी केल्याची कबुली दिली आणि खरेदी केलेल्या दागिन्याची लगड तयार केल्याचे सांगितले. तयार लगड त्याने पोलिसांच्या हवाली केली. नंतर पोलिसांनी विधीसंघर्षग्रस्त मुलाला ताब्यात घेतले तेव्हा त्याच्याजवळील रोख ४० हजार रुपये आणि सात ग्रॅमचे दागिने हस्तगत केले. ही कारवाई पोलीस निरीक्षक भागवत फुंदे, उपनिरीक्षक भगतसिंग दुल्हत, कर्मचारी संजय काळे प्रमोद खांडेभराड, राहुल पगारे यांनी केली.