वडिलांनी 'लिव्ह-इन'मधील मुलीला शोधून काढत बळजबरी घरी नेले, लिहून घेतली सुसाइड नोट
By सुमित डोळे | Published: November 23, 2023 12:10 PM2023-11-23T12:10:06+5:302023-11-23T12:11:06+5:30
शाळेपासून प्रेम, १९ व्या वर्षीच घेतला लिव्ह-इन मध्ये राहण्याचा निर्णय, कुटुंबाने शोध घेऊन गाठले, मुलाला मारहाण करुन मुलीला पळवून नेले
छत्रपती संभाजीनगर : शाळेत असतानाच त्या दोघांची झालेली ओळख पुढे प्रेमात बदलली. कायद्याने सज्ञान होताच दोघांनी विशीतच ‘लिव्ह-इन रिलेशनशिप’ मध्ये राहण्याचा निर्णय घेतला. भाडेतत्वावर स्वतंत्र घरात राहण्यास सुरुवातही केली. वडिलांनी मुलीचा माग काढत ५ नोव्हेंबर रोजी तिचे घर गाठले. मुलाला मारहाण करुन मुलीला बळजबरीने घेऊन गेले. परंतु मुलीने आई वडील मला मारुन टाकतील, अशी भीती व्यक्त करताच तरुणाने थेट पोलिसांकडे धाव घेतली. पोलिसांनी शोध घेऊन मुलीसह कुटुंबाला ठाण्यात आणले. मात्र वडिलांनी मुलीना पळवून नेल्यानंतर तिच्याकडून आत्महत्या करत असल्याची चिठ्ठी लिहून घेतल्याचीही धक्कादायक बाब चौकशीत समोर आली आहे.
एन-२ मध्ये राहणारा प्रीतज घोळवे (२०) व सारिका (१९, नाव बदलले आहे, रा. वाळूज) हे शाळकरी मित्र. ओळखीचे पुढे प्रेमात रुपांतर झाले. लॉचे शिक्षण घेणाऱ्या प्रीतजने कायद्याने सज्ञान होताच सारिका सोबत लिव्ह-इन-मध्ये राहण्याचा निर्णय घेतला. ५ ऑक्टोबर रोजी कुटुंब सोडून एन-९ मध्ये ते सोबत रहायला लागले. सारिकाचे वडील विनोद पाटील यांनी एमआयडीसी वाळूज ठाण्यात सारिका बेपत्ता झाल्याची तक्रार दिली. तेव्हा ठाण्यात सारिकाने पोलिसांना स्पष्टपणे ‘मला आई वडिलांकडे राहायचे नसून मित्र प्रीतज सोबत राहायचे आहे’ असा जबाब दिला. त्यानंतर मात्र सारिकाच्या वडिलांनी ५ नोव्हेंबर रोजी रात्री ९.३० वाजता पत्नी, मित्र विनोद अवसरमल, प्रिया अवसरमल व अन्य दोन ते चार जणांसोबत त्यांचे घर गाठले. प्रीतज व सारिकाने तेथून पळण्याचा प्रयत्न केला. मात्र, कीर्ती मंगल कार्यालयाजवळ अडवून आरोपींनी दोघांना मारहाण केली. प्रीतजचा मोबाईल हिसकावून सारिकाला बळजबरीने गाडीत बसवून घेऊन गेले.
चोरून केला संपर्क
सारिकाचा मोबाइल कुटुंबाने काढून घेतला. परंतु, तरीही सारिकाने २० नोव्हेंबर रोजी कुटुंबातील एका मोबाइलवरून प्रीतजला मेसेज केला. ‘हे मारून टाकतील रे मला, लवकर ये’ तसेच ‘तो दिसला तर त्याला तेथेच संपवा व हिलापण,’ असे सतत बोलत असल्याचे सांगितले. प्रीतजने थेट सिडको ठाण्यात धाव घेतली. गांभीर्य ओळखून पोलिसांनी तत्काळ सारिकाच्या घराचा शोध घेऊन सर्वांना ठाण्यात नेले. तेथेही सारिका प्रीतजसोबत राहण्यावर ठाम होती. त्यानंतर प्रीतजच्या तक्रारीवरून सारिकाचे वडील विनोद, आई व अवसरमल दाम्पत्यावर गुन्हा दाखल करण्यात आला. त्यानंतर विनोद पाटील व विनोद अवसरमलला अटक करण्यात आली. सध्या सारिकाला शासकीय आधारगृहात ठेवण्यात आले आहे.
वडिलांनीच लिहून घेतली मुलीच्या आत्महत्येची चिठ्ठी
सारिकाला बळजबरीने नेल्यानंतर काही दिवसांतच वडिलांनी तिच्याकडून चिठ्ठी लिहून घेतली. त्यात ‘आरक्षण नसल्याने शिक्षणापासून वंचित राहत असून, त्यामुळे शिकू शकत नाही आहे. त्यामुळे मी आत्महत्या करत असून, कोणालाही जबाबदार धरू नये.’ असा मजकूर त्यात लिहिला. त्यावर सही, अंगठादेखील घेतला. सारिकाने हे सांगितल्यानंतर पोलिसांनी ती चिठ्ठीदेखील जप्त केली. २३ ऑक्टोबर रोजीही सारिकाच्या वडिलांनी दोघांना जीवे मारण्याची धमकी दिली होती. त्यातही सिडको ठाण्यात अदखलपात्र गुन्ह्याची नोंद करण्यात आली. प्रीतजचे वडील पोलिस अधिकारी आहेत. त्यांनीही दोघांच्या प्रेमाला विरोध केल्याने त्यांनी स्वतंत्र राहण्याचा निर्णय घेतला.