वडिलांनी सोडले, आईने दुसरे लग्न केले; आजीने नातीला ५ हजारांत विकले!
By सुमित डोळे | Published: March 28, 2024 06:11 PM2024-03-28T18:11:05+5:302024-03-28T18:13:16+5:30
पैशांसाठी आजीने नातीला महिला हाेमगार्डला ५ हजारांत विकले; सिटी चौक पाेलिसांकडून बारा तासांत शोध
छत्रपती संभाजीनगर : पैशांसाठी सख्ख्या चुलत आजीनेच चार वर्षांच्या नातीचे अपहरण करून तिला ५ हजार रुपयांत विकले. सोमवारी पहाटे ही धक्कादायक घटना उघडकीस आली.
मूलबाळ होत नसल्याने कोपरगावच्या अलका काशीनाथ हुल्लाळे (५०) हिने मुलीची चुलत आजी सलीमा बेगम अजीज खान (४८, रा. मिसारवाडी) हिच्याकडून तिला विकत घेतले. सिटी चौक पोलिसांनी अवघ्या १२ तासांत सलीमा व अलकाचा शोध घेत दोघींना अटक केली. न्यायालयाने दोघींना दोन दिवस पोलिस कोठडीत ठेवण्याचे आदेश दिले.
चार वर्षांची रिहाना (नाव बदलले आहे) आजी, मामासोबत रोजाबाग परिसरात राहते. २४ मार्च रोजी दुपारी रिहाना परिसरात अन्य मुलांसोबत खेळत होती. मात्र, बराच वेळ होऊनही ती घरी परतली नाही. ती न सापडल्यामुळे घाबरलेल्या कुटुंबाने सिटी चौक पाेलिस ठाण्यात धाव घेतली. निरीक्षक निर्मला परदेशी यांनी घटनेचे गांभीर्य ओळखून तत्काळ अपहरणाचा गुन्हा दाखल करून तपासाचे आदेश दिले.
सीसीटीव्ही फुटेजची मदत
उपनिरीक्षक प्रशांत मुंडे, शिवाजी केरे यांनी पथकासह मुलीचा शोध सुरू केला. एका सीसीटीव्ही कॅमेऱ्याच्या फुटेजमध्ये एक बुरखाधारी महिला रिहानाला घेऊन जात असल्याचे कैद झाले. सायंकाळी पोलिसांच्या हे फुटेज हाती लागताच त्यांनी कुटुंबाला दाखवले. तेव्हा रिहानाच्या आजीने ती त्यांचीच नातेवाईक सलीमा असल्याचे सांगितले. पोलिसांनी सलीमाचा शोध सुरू केला तेव्हा ती शहागंजमध्ये काम करत असलेल्या हॉटेलमध्ये आढळली. पोलिसी खाक्या दाखवताच तिने रिहानाला वैजापूर बसस्थानकावर जाऊन कोपरगावच्या महिलेस ५ हजार रुपयांत विकल्याची कबुली दिली. अंमलदार राजेंद्र साळुंके, सुरेश बोडखे, आनंद वाहुळ, मनोहर त्रिभुवन, अन्वेज शेख, प्रवीण टेकले यांनी कोपरगाव गाठले. रिहानाची सुटका करून त्यांनी अलकाला अटक केली.
पैश्यांसाठी विकले नातीला
रिहानाचे वडील दुबईत गेल्यानंतर त्यांनी पत्नीला सोडून दिले. त्यामुळे रिहानाच्या आईने देखील दुसरा विवाह केला. त्यामुळे रिहाना जन्मापासून आजीकडेच राहते. सलीमाने त्याचाच गैरफायदा घेत तिला विकण्याचा कट रचला. विशेष म्हणजे, अलकाने ती नगर पोलिस दलात होमगार्ड असल्याचे सांगितले. गावातील नातेवाईकांमार्फत तिने सलीमाकडून रिहानाला विकत घेतले.