जमिनीच्या वादातून पित्याने केला पोटच्या मुलाचा खून
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 7, 2018 12:13 AM2018-12-07T00:13:40+5:302018-12-07T00:14:18+5:30
जमीन नावावर करून देण्याची मागणी करणाऱ्या पोटच्या मुलाचा डोक्यात टिकासच्या दांड्याने वार करून खून करणाºया बापाविरुद्ध सिल्लोड ग्रामीण पोलिसांनी गुरुवारी रात्री खुनाचा गुन्हा दाखल करून आरोपीला अटक केली. सिल्लोड तालुक्यातील वरूड येथे ही घटना घडली. विजय कौतिक मिरगे (२६, रा. वरूड), असे मृताचे नाव असून, कौतिक रायभान मिरगे (५०) हा आरोपी आहे.
लोकमत न्यूज नेटवर्क
सिल्लोड : जमीन नावावर करून देण्याची मागणी करणाऱ्या पोटच्या मुलाचा डोक्यात टिकासच्या दांड्याने वार करून खून करणाºया बापाविरुद्ध सिल्लोड ग्रामीण पोलिसांनी गुरुवारी रात्री खुनाचा गुन्हा दाखल करून आरोपीला अटक केली. सिल्लोड तालुक्यातील वरूड येथे ही घटना घडली. विजय कौतिक मिरगे (२६, रा. वरूड), असे मृताचे नाव असून, कौतिक रायभान मिरगे (५०) हा आरोपी आहे.
आता मुलगा तर गेला, पतीविरुद्ध तक्रार दिली, तर तोही जेलमध्ये जाईल, या विवंचनेत सापडलेल्या पत्नीने विजयच्या अंत्यविधीनंतर पतीविरुद्ध गुरुवारी तक्रार दिली. यावरून उपविभागीय पोलीस अधिकारी विशाल नेहूल यांच्या मार्गदर्शनाखाली सहायक पोलीस निरीक्षक विश्वास पाटील, फौजदार संदीप सावले यांनी गुरुवारी रात्री उशिरा गुन्हा दाखल केला.
कौतिक मिरगे याच्याकडे ९ एकर शेती असून, त्यांना विजय व विनोद ही २ मुले आहेत. यातील विजय हा साडेतीन एकर शेती करीत होता. सर्व खर्च विजय करायचा; पण जमीन बापाच्या नावावर असल्याने कौतिक शेतात माल आला की, विकून टाकायचा. यावरून बाप-लेकात सतत वाद होत होते. १ डिसेंबर रोजी रात्री ८.३० वाजता बापाने शेतमाल विकल्याने रागात असलेल्या विजयने माझी शेती माझ्या नावावर करून द्या, अशी मागणी केली; पण बापाने रागाच्या भरात विकासच्या डोक्यात टिकासने वार केले. विजयची आई अनिता मिरगे हिने सोडविण्याचा प्रयत्न केला; पण तिला अपयश आले. तिने आरडाओरड केल्यावर रक्ताच्या थारोळ्यात पडलेल्या विजयला शेजारील नागरिक व भाऊ विनोदने तातडीने सिल्लोड येथील उपजिल्हा रुग्णालयात व नंतर औरंगाबाद येथील घाटी रुग्णालयात दाखल केले. मात्र, उपचार सुरू असताना बुधवारी दुपारी विजयची प्राणज्योत मालवली. गुरुवारी या घटनेची बोंब झाल्यानंतर पोलिसांनी कारवाई केली व नराधम बापाला अटक केली.
आई... माझ्या मुलाचा सांभाळ कर!
रक्ताच्या थारोळ्यात पडलेल्या विजयजवळ आई होती. आपण वाचत नाही, हे विजयला समजले होते. अर्धवट शुद्धीत त्याने आईला ‘माझ्या मुलाला सांभाळ गं’ असे विव्हळत सांगितले. अंगाला शहारा आणणारे हे वक्तव्य ऐकून आईपण हादरली होती. हे दृश्य बघून तिने कठोर होऊन पतीविरुद्ध खून केल्याची तक्रार दिली.
मयताची पत्नी प्रसूतिसाठी गेली होती माहेरी
विजयच्या पार्थिवावर बुधवारी संध्याकाळी शोकाकुल वातावरणात अंत्यसंस्कार करण्यात आले.
मयत विजयच्या पश्चात पत्नीसह १ सहा वर्षांचा मुलगा आहे. त्याची पत्नी गर्भवती असून, ती प्रसूतिसाठी माहेरी गेलेली आहे. या घटनेमुळे तालुक्यात हळहळ व्यक्त होत आहे.