शाळेतून परस्पर निघून गेला म्हणून बापाने केली मुलाची हत्या
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 4, 2019 12:07 AM2019-01-04T00:07:59+5:302019-01-04T00:08:25+5:30
: मुलगा शाळेत जातो म्हणून शाळेत न जाता परस्पर इतरत्र निघून गेला, याचा राग आल्याने दारूच्या नशेत वडिलांनी मुलाला मारहाण केली. यात गंभीर जखमी झाल्याने मुलाने जागेवरच प्राण सोडला. ही घटना फेरणजळगाव-दरेगाव येथील एका शेतवस्तीवर बुधवारी (दि.२) घडली. आरोपी पिता घटनास्थळावरून फरार झाला. ठार झालेल्या मुलाचे नाव रवी प्रभुसिंग बैनाडे (१३) असे आहे.
करमाड : मुलगा शाळेत जातो म्हणून शाळेत न जाता परस्पर इतरत्र निघून गेला, याचा राग आल्याने दारूच्या नशेत वडिलांनी मुलाला मारहाण केली. यात गंभीर जखमी झाल्याने मुलाने जागेवरच प्राण सोडला. ही घटना फेरणजळगाव-दरेगाव येथील एका शेतवस्तीवर बुधवारी (दि.२) घडली. आरोपी पिता घटनास्थळावरून फरार झाला. ठार झालेल्या मुलाचे नाव रवी प्रभुसिंग बैनाडे (१३) असे आहे.
रवी बैनाडे हा फेरणजळगाव येथील प्राथमिक शाळेत इयत्ता सातवीत शिकत होता. मंगळवारी सकाळी तो शाळेत जातो म्हणून घराबाहेर पडला. शाळा सुटल्यावर तो घरी न जाता औरंगाबाद-जालना मार्गावरील एका हॉस्पिटलच्या आवारात कुठेतरी झोपला. त्यामुळे तो मंगळवारी रात्री घरी गेलाच नाही. बुधवारी सकाळी पुन्हा तो शाळेत हजर झाला. आई-वडील त्याला शाळेत पाहण्यासाठी आले असता तो शाळेत उपस्थित होता. यावेळी शाळेतील शिक्षकांनी त्याची व वडिलांची समजूत काढली. त्यानंतर वडील घरी परतले. शाळा सुटल्यावर रवी घरी आल्यावर वडील प्रभुसिंग बैनाडे यांनी दारूच्या नशेत त्याला काठीने बेदम मारहाण केली. त्यात तो गंभीर जखमी अवस्थेत जागेवरच निपचित पडला. हे पाहून वडील घटनास्थळाहून फरार झाले. माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेऊन रवीला औरंगाबाद येथील घाटी रुग्णालयात दाखल केले. डॉक्टरांनी त्याला तपासून मृत घोषित केले.
पोलिसांनी आरोपी प्रभुसिंग विठ्ठलसिंग बैनाडे (४०) यांच्याविरुद्ध खुनाचा गुन्हा दाखल केला. अधिक तपास पोलीस निरीक्षक अजिनाथ रायकर यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक प्रदीप भिवसने, जमादार तुळशीराम चाबुकस्वार, रवींद्र साळवे, ज्ञानेश्वर बेले करीत आहेत.
-------------