रक्तबंबाळ स्थितीत वडिलांनी केला मुलासह इतरांचा बचाव
By Admin | Published: April 27, 2017 08:52 PM2017-04-27T20:52:05+5:302017-04-27T20:52:05+5:30
घाटी रुग्णालयात जळीत रुग्णांच्या वॉर्डात उपचार घेणाऱ्या एका रुग्णाचे अचानक मानसिक संतुलन बिघडल्याने त्याने दुसऱ्या रुग्णावर हल्ला
ऑनलाइन लोकमत
औरंगाबाद, दि. 27 - घाटी रुग्णालयात जळीत रुग्णांच्या वॉर्डात उपचार घेणाऱ्या एका रुग्णाचे अचानक मानसिक संतुलन बिघडल्याने त्याने दुसऱ्या रुग्णावर हल्ला चढविला, परंतु त्या रुग्णाच्या वडिलांनी मुलाच्या बचावासाठी तात्काळ धाव घेत मानसनिक संतुलन बिघडलेल्या रुग्णाचा हल्ला थोपविण्याचा प्रयत्न केला. परंतु नियंत्रणाबाहेर असलेल्या या रुग्णाच्या जोरदार ठोशाने दात पडल्याने वडील रक्तबंबाळ झाले. जखमी अवस्थेतही या रुग्णाकडून इतरांवर हल्ला होऊ नये, म्हणून वडिलांनी त्याच्याशी एकप्रकारे झुंज देत त्याला ओढत वॉर्डाबाहेर काढल्याची घटना गुरुवारी(दि.२७)घडली.
कांतीलाल शेटे(५८, रा. कसाबखेडा)असे या हल्लात जखमी झालेल्या व्यक्तीचे आणि मुलाचा बचाव करणाऱ्या वडिलांचे नाव आहे. त्यांचा मुलगा प्रशांत शेटे (३०) यांनी २३ एप्रिल रोजी तणाखाली जाळून घेतले होते. उपचारासाठी घाटी रुग्णालयातील वॉर्ड क्रमांक २२ व २३ येथील ह्यआयसीयूह्णमध्ये दाखल करण्यात आले. ते ८० टक्के जळालेले असून त्यांच्या समोरच्या खाटेवरच ३० टक्के जळालेल्या हरिश पवार(४०, रा.भोकरदन, जि. जालना) यांच्यावर उपचार सुरू होते. गुरुवारी सकाळी ११.३० वाजेच्या सुमारास प्रशांत शेटे यांच्याजवळ कांतीलाल शेटे हे बसलेले होते. याच वेळी हरिश पवार अचानक प्रशांत शेटे यांच्यावर धावून गेला. अचानक झालेल्या हल्ल्यात मुलाला वाचविण्यासाठी कांतीलाल शेटे यांनी हरिश पवार यास रोखण्याचा प्रयत्न केला. परंतु तो ह्यमी मारणारच, सोडणार नाहीह्ण असे म्हणत जोरदार हल्ला चढवित होता.
प्रतिकार करताना अचानक हरिश पवारने मारलेल्या जोरदारर बुक्कीने कांतीलाल शेटे यांचे दोन दात पडले आणि त्यांच्या तोंडातून मोठ्या प्रमाणात रक्तस्त्राव सुरू झाला. कांतीलाल शेटे यांनी मदतीसाठी ह्यवाचवा वाचवाह्ण म्हणून हाक दिली. परंतु या घटनेने भयभित झालेल्या वॉर्डातील परिचारिकांनी, कर्मचाऱ्यांनी वॉर्डातील इतर खोल्यांचे दरवाजे लावून घेतले. तर काही कर्मचाऱ्यांनी वॉर्डाबाहेर पळ काढला. हरिश पवार अधिक आक्रमक होत असल्याचे लक्षात आल्याने इतरांवर हल्ल्याचा धोका होता. त्यामुळे कांतीलाल शेटे यांनी झटापट करून आणि ओढून त्याला वॉर्डाबाहेर ढकलेले आणि दरवाजा लावून घेतला. घटनेची माहिती मिळताच सुरक्षारक्षकांनी तात्काळ धाव घेतली आणि त्याच्यावर नियंत्रण मिळविले. त्यामुळे इतर वॉर्डांमध्ये हल्ल्याचा प्रकार टळला. या घटनेमुळे २२ व २३ वॉर्डात गोंधळाचे आणि भितीचे वातावरण निर्माण झाले होते. कांतीलाल शेटे यांच्यावर घाटीत उपचार करण्यात आले. या घटनेची माहिती मिळताच पोलीस अधिकाऱ्यांनीही घाटीत धाव घेतली.