बाप नंबरी, बेटा दस नंबरी! साॅफ्टवेअरने महागड्या कारचा कोड स्कॅन करून ३ मिनिटांत चोरी
By सुमित डोळे | Published: January 15, 2024 08:02 PM2024-01-15T20:02:49+5:302024-01-15T20:03:43+5:30
दोघांनी २०२० पासून अद्ययावत तंत्रज्ञानाच्या मदतीने चोऱ्या सुरू केल्या. कार चोरताच ते हरयाणा, हैदराबाद, पंजाबात एजंटला विकत
छत्रपती संभाजीनगर : लाखोंचे साॅफ्टवेअर विकत घेऊन महागड्या कारवर असलेला कोड स्कॅन करून क्षणात चोरी करणारे बाप-लेक शेख दाऊद शेख मंजूर (५८) व शेख अरबाज शेख दाऊद (१९, रा. घाटनांद्रा, बुलढाणा) हे गुन्हे शाखेच्या हाती लागले आहेत. आठ महिन्यांमध्ये त्यांनी शहरातून ९, तर अन्य तीन जिल्ह्यांतून ५ चारचाकी चोरल्या. त्या सर्व हरयाणा व पंजाबमध्ये विकल्याने त्या शोधण्याचे मोठे आवाहन पोलिसांसमोर आहे. मात्र, त्यांची कार चोरण्याची अद्ययावत यंत्रणा पाहून पोलिसही आश्चर्यचकित झाले. ‘बाप नंबरी, बेटा दस नंबरी’ सिनेमाप्रमाणेच ही गुन्हेगार बाप-लेकाची जोडी आहे.
९ डिसेंबर रोजी एन-४ मध्ये राहणाऱ्या दिनेश पाटील यांची घरासमोरून इनोव्हा कार चोरीला गेली होती. गुन्हे शाखा तपास करत असताना एका सीसीटीव्ही कॅमेऱ्यात चोर कैद झाले होते. ते राज्यभरात वाहनचाेरीसाठी कुख्यात दाऊद असल्याचे दिसले. गुन्हे शाखेचे निरीक्षक संदीप गुरमे यांच्या सूचनेवरून उपनिरीक्षक प्रवीण वाघ, अंमलदार संजय नंद, योगेश नवसारे यांनी त्यांचा शोध सुरू केला. दोन सापळ्यांतून बाप-लेक निसटले. १२ जानेवारी रोजी ते नारेगावमध्ये येत असल्याची माहिती मिळताच वाघ, नंद यांनी परभत म्हस्के, विजय भानुसे, संजीवनी शिंदे, ज्ञानेश्वर पवार यांच्यासह सापळा रचून त्यांना पकडले.
८ महिने, १४ कार
दाऊद व त्याच्या ४ मुलांवर आतापर्यंत राज्यभरात वाहनचोरीचे ३० वर गुन्हे नोंद आहेत. दोघांनी २०२० पासून अद्ययावत तंत्रज्ञानाच्या मदतीने चोऱ्या सुरू केल्या. कार चोरताच ते हरयाणा, हैदराबाद, पंजाबात एजंटला विकतात. प्रामुख्याने नव्या क्रेटा, इनोव्हा गाड्याच ते चोरतात. ऑगस्ट २०२३ मध्ये जालना पोलिसांनी दाऊदच्या चारही मुलांना अटक केली होती.
अशी करतात चोरी
-ऑनलाइन बाजारात, दिल्लीला १.५ ते ४ लाखांपर्यंत रिले बॉक्स किंवा ओबीडी डिव्हाइस विकत येते.
-नव्या कारवर अनेकदा बारकोड चिटकवलेला असतो. तो या बॉक्सद्वारे स्कॅन केल्यास कारची सर्व इत्थंभूत माहिती येते.
-लॅपटॉपवरून कार रिसिट करताच कार उघडते.
-त्याशिवाय, स्क्रू ड्रायव्हरने दरवाजा तोडून ओबीडी डिव्हाइस कारला कनेक्ट करतात.
-कॉर्डद्वारे डिव्हाइस कनेक्ट करून सेन्सर बंद करून कुठल्याही चावीने कार सुरू होते.