बाप-लेकाची भेट अधुरी राहिली; आकाशवाणी चौकात भरधाव कारने ७५ वृद्धास उडवले
By ऑनलाइन लोकमत | Published: June 8, 2023 02:07 PM2023-06-08T14:07:33+5:302023-06-08T14:08:48+5:30
७५ वर्षीय वृद्ध कन्नड तालुक्यातील गावातून मुलांना भेटण्यासाठी छत्रपती संभाजीनगर येथे आले होते
छत्रपती संभाजीनगर: कन्नड तालुक्यातील भांबरवाडी येथून छत्रपती संभाजीनगरात राहणाऱ्या मुलांना भेटण्यासाठी आलेल्या एका वृद्धास आकशवाणी चौकात भरधाव कारने बुधवारी दुपारी उडवले. रात्री १२ वाजेच्या सुमारास उपचारादरम्यान वृद्धाचा मृत्यू झाला. दीपा राठोड ( ७५ )असे मृताचे नाव आहे.
भांबरवाडी येथील दीपा राठोड यांची दोन मुले काशिनाथ आणि शंकर छत्रपती संभाजीनगर येथे राहतात. भानुदास नगर येथे राहणाऱ्या काशिनाथ याला भेटण्यासाठी बुधवारी सकाळी कन्नड येथून राठोड निघाले. दुपारी छत्रपती संभाजीनगर येथे पोहचल्यानंतर अडीज वाजेच्या सुमारास ते रिक्षाने आकाशवाणी चौकात आले. येथून भानुदास नगरकडे जात असताना एका भरधाव कारने राठोड यांना उडवले. जोरदार धडकेने गंभीर जखमी झालेल्या राठोड यांना नागरिकांनी रुग्णालयात दाखल केले. माहिती मिळताच काशिनाथ आणि शंकर या दोन्ही मुलांनी रुग्णालयात धाव घेतली. रात्री १२ वाजेच्या सुमारास राठोड यांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला.
वृद्ध दीपा राठोड मुलांना भेटण्यासाठी शहरात आले होते. अपघातात प्राण गमवल्याने बाप-लेकाची भेट अधुरी राहिली. दरम्यान, आकाशवाणी चौकात वाहतुकी कोंडी आणि पादचारी सुरक्षेचा प्रश्न गंभीर झाला आहे. मागील काही दिवसांपासून या चौक बंद करून वाहतूक सकाळी ९ ते रात्री ९ एकेरी करण्यात आली आहे. या परिसरातील नागरिकांचा यास विरोध आहे. तर येथे सातत्याने वाहतूक कोंडी होत असल्याने वाहनधारक त्रस्त आहेत.