चिऊताईंचा बाबा ! दाणापाण्याच्या शोधात आलेल्या दोन चिमण्यांचं कुटुंब आता शंभरावर गेलंय
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 20, 2019 03:48 PM2019-05-20T15:48:22+5:302019-05-20T16:05:33+5:30
चिमण्यांसाठी माहेर झालंय मोईनोद्दीन शेख यांचे घर
- भागवत हिरेकर
औरंगाबाद : पक्ष्यांना माणसांचा लळा लागला की, ते हक्कानं घरादारात वावरायला लागतात. एकदम निश्चिंत होऊन. असंच हस्ताजवळील (ता.कन्नड) नवाट वस्तीवरील मोईनोद्दीन शेख यांचं एक घर चिमण्यांसाठी माहेर झालंय अन् मोईनोद्दीन अजीज शेख चिमण्यांचे बाबा! दाणापाण्याच्या शोधात आलेल्या दोन चिमण्यांचं कुटुंब आता शंभरावर गेलंय. त्यांच्यासाठी मोईनोद्दीन शेख यांनी घरटी केली. दाणापाण्याची बडदास्त ठेवलीय. त्यामुळे या चिमण्यांनी नातवंडांसारखाच त्यांच्या अवघ्या घराचा ताबा घेतला आहे. हल्ली चिमण्या दिसत नाहीत, असा तक्रारीचा स्वर उमटत असताना शेख यांच्या घरादारात पहाटेपासून रात्रीपर्यंत फक्त चिवचिवाटच घुमत राहतो.
वन विभागातील मोईनोद्दीन अजीज शेख सध्या गौताळा अभयारण्यात कर्तव्यावर असतात. नोकरी करीत असताना पशू-पक्ष्यांची पाण्याअभावी होणारी तडफड त्यांनी बघितलेली. त्यातूनच ते घरासमोर रांजणाच्या आजूबाजूला पक्ष्यांसाठी पाणी ठेवायचे. मग या चिमण्या त्यांच्याकडे आल्या. त्यांची कथा मोईनोद्दीन शेख यांनी सांगितली. ‘पक्ष्यांना पाणी ठेवायचो. यातच दोन अडीच वर्षांपूर्वी दोन-तीन चिमण्या यायला लागल्या. तांदूळ, गव्हाचा भरडा आणि पाणी एकाच ठिकाणी मिळायचं म्हणून त्या इथंच रमल्या. मग त्यांच्यासाठी घरटी तयार केली. त्यामुळं चिमण्यांची संख्या वाढतच गेली. आजघडीला शंभरावर चिमण्या इथं राहतात. त्यासाठी मी २५ -३० घरटी , तर त्यांनीही खिडक्या, घरात जिथं जागा मिळेल तिथं घरटी तयार केलीय. अशी पन्नास-साठ घरटी घरात आहेत. आता तर सकाळी तांबडं फुटलं की, चिमण्यांचा चिवचिवाट सुरू होऊन जातो.
त्यांचेही हट्ट...
चिमण्यांसाठी तांदूळ, गव्हाचा भरडा हे खायला असतोच; पण सकाळी घरात स्वयंपाक सुरू झाला की, चिमण्या आजूबाजूला गर्दी करतात. भाकरी करताना त्यांना पिठाचे गोळे टाकावेच लागतात. नाही तर त्याचा गोंगाट वाढतच जातो. तेच जेवतानाही. ताटात भात असेल, तर त्यांना द्यावा लागतोच, हे सांगताना मोईनोद्दीन शेख आणि या चिमण्यांमध्ये तयार झालेलं नातं दिसून येतं.
मग घरच्यांनाही लळा लागला
सुरुवातीला कमी चिमण्या होत्या. त्या हळूहळू वाढत गेल्या. या चिमण्या घरटी तयार करण्यासाठी गवत, काड्या घेऊन यायच्या. ते घेऊन येताना, घरटी बनवताना घरात पडायचं आणि सतत कचरा व्हायचा. त्यामुळं बायको चिडचिड करायची; पण आता हे सगळं करताना तिची चिडचिड होत नाही. उलट तिलाही त्यांचा लळा लागला आहे.
वेगळे समाधान मिळते
फॉरेस्ट डिर्पाटमेंटमध्ये काम करताना पक्ष्यांविषयी आपुलकी वाटू लागली. मग त्यातूनच पुढं घराच्या समोर पाणी आणि तांदूळ टाकायचो. शेतातच राहायला असल्याने याच काळात दोन-तीन चिमण्या आल्या. आता त्यांनी घरटी केली. काही मी केली. त्यासाठी डबे, पाईप विकत आणले. त्यांचा गोतावळा एवढा मोठा झाला आहे की, शंभर चिमण्या इथं बिनधास्त राहताहेत. हे करण्याच वेगळं समाधान मला मिळतं.
- मोईनोद्दीन शेख