पोटच्या मुलीवर अत्याचार करणाऱ्या नराधम पित्याला मरेपर्यंत दुहेरी जन्मठेप
By प्रभुदास पाटोळे | Published: March 21, 2024 11:53 AM2024-03-21T11:53:34+5:302024-03-21T11:54:02+5:30
‘दुसऱ्या रस्त्याने घरी जाऊ’ असे म्हणत निर्जनस्थळी नेत केला मुलीवर अत्याचार
छत्रपती संभाजीनगर : पोटच्या १६ वर्षांच्या मुलीला मारहाण करून, जीवे मारण्याची धमकी देत लैंगिक अत्याचार करणाऱ्या नराधम पित्याला सत्र न्यायाधीश ए. एस. वैरागडे यांनी दोन कलमांखाली मरेपर्यंत दुहेरी जन्मठेप आणि एक लाख दोन हजार रुपये दंड ठोठावला.
पीडितेने दिलेल्या फिर्यादीनुसार तिचे आई-वडील एका वीटभट्टीवर काम करीत होते. ८ जून २०२२ च्या सायंकाळी तिचा बाप दारू पिऊन घरी आला. त्याच्या पत्नीने त्याला जेवण दिले. त्याने कसेबसे जेवण आटोपले व मुलीला म्हणाला, माझ्यासोबत वीटभट्टीवर चल, तेथून बिऱ्हाड घेऊन येऊ. आईला विचारते, असे मुलगी म्हणाली असता, तिला काही सांगू नको, असे म्हणत बापाने मुलीला सोबत घेतले. रात्री ९ वाजेच्या सुमारास ते वीटभट्टीवर पोहोचले. तेथील खोलीतून बापाने फक्त दोन रग घेतल्या, उर्वरित सामान बांधून तेथेच ठेवले.
त्याने ‘दुसऱ्या रस्त्याने घरी जाऊ’ असे म्हणत मुलीला वीटभट्टीजवळच्या तळ्याच्या बाजूला नेले. आपण आज इथेच मुक्काम करू व सामान नंतर घरी नेऊ, अशी थाप मारत मुलीला बळजबरी झोपवले व विकृत चाळे करू लागला. मुलीने विरोध केला. बापाने तिला मारहाण करून जीवे मारण्याची धमकी देत बळजबरी अत्याचार केला. त्यानंतर मुलीच्या आईचे मामा काम करीत असलेल्या वीटभट्टीवर त्याने मुलीला सोडले. एवढ्या रात्री का आणले, असे त्यांनी विचारले असता सामान घेण्यासाठी आणले होते, असे सांगून बापाने तेथून पळ काढला. दुसऱ्या दिवशी आईने विचारले असता, तिने घडलेला प्रकार सांगितला. याबाबत खुलताबाद पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता.
तपास अधिकारी निरीक्षक हातमोडे आणि उपनिरीक्षक मोरे यांनी दोषारोपपत्र दाखल केले. खटल्याच्या सुनावणीवेळी सहायक लोकअभियोक्ता अरविंद बागूल यांनी १० साक्षीदारांचे जबाब नोंदविले. सुनावणीअंती न्यायालयाने पित्याला दोषी ठरवून भादंवि कलम ३७६ (२)(एफ) अन्वये मरेपर्यंत जन्मठेप आणि ५० हजारांचा दंड, कलम ३७६ (२) (एन) अन्वयेसुद्धा मरेपर्यंत जन्मठेप आणि ५० हजार रुपये दंड, कलम ३२३ अन्वये ३ महिने सक्तमजुरी व एक हजार दंड, तसेच कलम ५०६ अन्वये एक वर्ष सक्तमजुरी व एक हजार रुपये दंड ठोठावला. पैरवी अधिकारी म्हणून पोलिस नाईक जबीर शेख यांनी काम पाहिले.