मुलाच्या लग्नाची पत्रिका वाटताना वर पित्यावर काळाचा घाला
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 8, 2020 03:15 PM2020-02-08T15:15:17+5:302020-02-08T15:17:25+5:30
या घटनेत अन्य एक जण किरकोळ जखमी झाले असून त्यांच्यावर घाटी रुग्णालयात उपचार करण्यात आले.
औरंगाबाद: मुलाची लग्न पत्रिका देण्यासाठी पाहुण्यांच्या वर्कशॉपमध्ये आलेल्या वरबापाचा लोखंडी रॅक खाली दबून अंत झाल्याची घटना पडेगाव येथे शनिवारी सकाळी ११ वाजेच्या सुमारास घडली. या घटनेत अन्य एक जण किरकोळ जखमी झाले असून त्यांच्यावर घाटी रुग्णालयात उपचार करण्यात आले.
दत्तू नामदेव तायडे (५४,रा. पडेगाव)असे मृताचे नाव आहे. तर उत्तमराव पवार(रा.पडेगाव)हे या घटनेत किरकोळ जखमी झाले. याविषयी प्राप्त माहिती अशी की, दत्तू तायडे यांच्या धाकटा मुलगा किशोर यांचा विवाह २७ फेब्रुवारी रोजी आयोजित करण्यात आला आहे. किशोरच्या लग्नाची पत्रिका घेऊन तायडे, त्यांचा मोठा मुलगा प्रवीण हे शनिवारी सकाळी साडेदहा ते पावणे अकरा वाजेच्या सुमारास पडेगाव येथील त्यांचे नातेवाईक अजीनाथ केशवराव पंडित यांच्या फेब्रीकेशनच्या वर्कशॉपमध्ये गेले होते.
यावेळी पंडित यांच्या टेबलसमोरील खुर्चीवर तायडे पिता-पुत्र आणि उत्तमराव पवार बसलेले होते. पत्रिका दिल्यानंतर लग्नाला या असे त्यांनी हक्काने पंडित यांना सांगितले. यावेळी अचानक दत्तू तायडे यांच्यामागील सुमारे पंधरा ते वीस फुट लांबीचे आणि ३ ते ४ टन वजनी लोखंडी अँगल ठेवलेले रॉक कोसळले. याघटनेत दत्तू हे टेबल आणि रॅकखाली दबल्या गेले. तर पवार यांच्या अंगावरही काही लोखंडी वस्तू पडल्या, तर या घटनेत प्रवीण आणि वर्कशॉपमालक पंडित यांना कोणतीही दुखापत झाली नाही. यावेळी आरडाओरड झाल्याने वर्कशॉपमधील कामगार, प्रवीण आणि अजीनाथ यांनी रॅक आणि लोखंडी अँगल्सखाली दबलेल्या दत्तू यांना बाहेर काढण्यासाठी प्रयत्न सुरू केले. त्यांच्यावर पडलेला लोखंडी रॅक, पाईप आणि अँगल्स खूप वजनी होते.
हे सर्व साहित्या उचलण्यासाठी सुमारे पंधरा ते वीस मिनिटे लागली. यानंतर सर्वांनी मिळून रॅक आणि टेबलमध्ये दबलेल्या दत्तू यांना गंभीर जखमी अवस्थेत बाहेर काढले. या घटनेत त्यांच्या डोक्याला, मानेला, पाठीचा आणि कमरेचा मणका तुटून ते बेशुद्ध पडले. त्यांना तातडीने घाटी रुग्णालयात दाखल करण्यात आले. मात्र तोपर्यंत उशीर झाला होता, अपघात विभागातील डॉक्टरांनी दत्तू यांना तपासून मृत घोषित केले. याविषयी छावणी ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली.
दत्तू तायडे होते रेल्वेचे कर्मचारी
मृत दत्तू हे भारतीय सैन्यदलातून निवृत्त झाल्यानंतर रेल्वे खात्यात नोकरीला लागले होते. त्यांचे मूळ गाव अंधारी आहे. ते पडेगाव येथे पत्नी, दोन मुलांसह राहात होते.