चोरी प्रकरणी मुलाला अटक होताच पित्याने सोडला जीव
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 9, 2021 01:17 PM2021-12-09T13:17:40+5:302021-12-09T13:18:31+5:30
दुचाकी चोरीप्रकरणी पोलिसांनी कारवाई करताच पित्यास हृदयविकाराचा झटका आल्याची घटना पैठण तालुक्यातील तारु पिंपळगाव येथे घडली
जायकवाडी ( औरंगाबाद ) : दुचाकी चोरीप्रकरणात मुलाला पोलिसांनी ताब्यात घेतल्याने वडिलांनी मोठा धसका घेतला. त्यातच हृदयविकाराचा झटका येऊन त्यांचा मृत्यू झाला. ही घटना पैठण तालुक्यातील तारु पिंपळगाव येथे मंगळवारी मध्यरात्री घडली. शब्बीर शेख (६३) असे मृताचे नाव आहे. या घटनेमुळे बिडकीनसह तारु पिंपळगावात तणावाचे वातावरण निर्माण झाले होते.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, एमआयडीसी पैठण पोलीस ठाण्याच्या हद्दीत सोमवारी (दि.६) सकाळी गस्तीदरम्यान एक संशयित दुचाकी पोलिसांच्या नजरेत पडली. चौकशीनंतर ती चोरीची असून, तिचा मालक अमजद शेख असून, तो एमआयडिसी पोलीस ठाण्यात होमगार्ड म्हणून कार्यरत आहे. तसेच तो बनावट नंबर प्लेट लावून ही दुचाकी चालवीत असल्याचेसुद्धा तपासात स्पष्ट झाले. त्यानंतर पोलिसांनी अमजद शेखला ताब्यात घेऊन चौकशी केली असता, त्याने ही दुचाकी दत्ता निंभोरे याच्याकडून घेतल्याचे सांगितले.
पोलिसांनी दत्ता निंभोरे याला ताब्यात घेतल्यानंतर त्याने ही दुचाकी कारखाना परिसरातील गोरख जगधने याच्याकडून घेतल्याचे सांगितले. पोलिसांनी नंतर गोरख जगधनेला अटक करून चौकशी केल्यानंतर ही दुचाकी चोरीची असून, तिच्यासह पाच पाण्यातील मोटारपंप हे तारु पिंपळगाव येथील बिलाल शब्बीर शेख याच्याकडून खरेदी केल्याचे सांगितले. या घटनेतील मुख्य सूत्रधार स्पष्ट झाल्यानंतर पोलीस मंगळवारी रात्री दीड वाजेच्या सुमारास बिलाल याच्या घरी धडकले. त्यांनी चोरीप्रकरणी बिलाल याला ताब्यात घेऊन ठाण्यात आणले.
या घटनेचा बिलालचे वडील शब्बीर शेख यांना मोठा धक्का बसला. त्यात हृदयविकाराचा झटका आला. कुटुंबीयांनी त्यांना बिडकीन येथील शासकीय रुग्णालयात दाखल केल्यानंतर डॉक्टरांनी तपासून मृत घोषित केले. याप्रकरणी अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. दुचाकी चोरीप्रकरणी वरील चार आरोपींविरोधात पैठण एमआयडीसी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
गावात छावणीचे स्वरूप
बिलालला अटक केल्यानंतर शब्बीर शेख यांचे निधन झाल्याची बातमी गावात आणि नातेवाईकांना कळताच बिडकीन शासकीय रुग्णालय आणि तारु पिंपळगावात मोठा जमाव जमला. पोलिसांनी रात्री अचानक कारवाई केल्यानेच त्यांचा मृत्यू झाल्याचा आरोप नातेवाईकांनी केल्याने, दोन्ही ठिकाणी तणाव निर्माण झाला होता. यामुळे पोलिसांनी तारु पिंपळगावात मोठा बंदोबस्त तैनात केला होता. खबरदारीचा उपाय म्हणून पोलीस उपविभागीय अधिकारी विशाल नेहूळ यांनी तिन्ही पोलीस ठाण्यातील अधिकारी, कर्मचारी आणि दंगाकाबू पथक तैनात केले होते.