शेती वाटून देत नसल्याच्या कारणावरून वडिलांचा खून
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 7, 2018 12:31 AM2018-03-07T00:31:41+5:302018-03-07T00:31:46+5:30
शेती वाटून देत नसल्याने पोटच्या मुलाने व सुनेने केलेल्या मारहाणीत वडिलांचा मृत्यू झाल्याची हृदयद्रावक घटना कन्नड तालुक्यातील निंभोरा येथे मंगळवारी दुपारी उघडकीस आली. यानंतर पुरावा नष्ट करण्याचाही प्रयत्न करण्यात आला.
पिशोर : शेती वाटून देत नसल्याने पोटच्या मुलाने व सुनेने केलेल्या मारहाणीत वडिलांचा मृत्यू झाल्याची हृदयद्रावक घटना कन्नड तालुक्यातील निंभोरा येथे मंगळवारी दुपारी उघडकीस आली. यानंतर पुरावा नष्ट करण्याचाही प्रयत्न करण्यात आला.
कन्नड तालुक्यातील निंभोरा येथे एका वृद्धास ठार मारून घरात टाकून दिल्याची माहिती मिळाल्यावरून पोलिसांनी घटनास्थळाकडे धाव घेतली. सपोनि. अभिजित मोरे, उपनिरीक्षक जयराज भटकर, जमादार संजय देवरे, संजय आटोळे, पोना. सतीश देवकर, पो.कॉ. देशमुख यांनी निंभोरा येथे घटनास्थळी आडवळ शिवारातील गट नं. २६९ येथे जाऊन पाहिले असता कारभारी सांडू सोनवणे (६५) यांचा मृतदेह आढळून आला. मयत कारभारी यांच्या अंगावर मारहाणीच्या खुणा स्पष्ट दिसून येत असल्याने पोलिसांना संशय आला. मिळालेल्या माहितीवरून पोलिसांनी कारभारी सोनवणे यांचा मुलगा हरी व त्याची पत्नी सुनीता हरी सोनवणे यांना ताब्यात घेऊन विचारपूस केली. त्यानंतर वेळोवेळी मागणी करूनसुद्धा वडील जमीन वाटून देत नसल्याने राग होता. सोमवारी शेतातील घरी रात्री वडिलांशी वाद झाला. यात बांबूच्या काठीने मारहाण केली. या मारहाणीत कारभारी सोनवणे यांचा मृत्यू झाला.
पत्र्याच्या खोलीत मृतदेह फेकून पलायन
सासºयाचा मृत्यू झाल्याचे सुनेच्या लक्षात येताच कारभारी सोनवणे यांना पत्र्याच्या खोलीत टाकून पतीसह गावाकडे पलायन केले. यावरून हरी कारभारी सोनवणे व सुनीता हरी सोनवणे यांच्याविरुद्ध सपोनि. अभिजित मोरे यांच्या फिर्यादीवरून पिशोर पोलीस ठाण्यात खून व पुरावा नष्ट केल्याचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. करंजखेड प्राथमिक आरोग्य केंद्रात कारभारी सोनवणे यांचे शवविच्छेदन करण्यात आले. अप्पर पोलीस अधीक्षक उज्ज्वला वनकर यांच्या मार्गदर्शनाखाली उपविभागीय पोलीस अधिकारी नीरज राजगुरू या प्रकरणाचा अधिक तपास करीत आहेत. पोटच्या मुलाने व सुनेने मिळून हे कृत्य केल्याने परिसरात हळहळ व्यक्त करण्यात येत आहे.