श्रुतीला पुन्हा हात मिळण्यासाठी पित्याची धडपड; प्रत्यारोपण शक्य, पण खर्च कसा करणार ?

By संतोष हिरेमठ | Published: June 27, 2024 01:31 PM2024-06-27T13:31:10+5:302024-06-27T13:34:17+5:30

ज्या हातांनी श्रुती भातुकली खेळत होती, लिहिणे शिकत होती, ते हातच विजेच्या धक्क्याने कायमचे गेले

Father's struggle to regain Shruti's hand; Transplant possible, but how to spend? | श्रुतीला पुन्हा हात मिळण्यासाठी पित्याची धडपड; प्रत्यारोपण शक्य, पण खर्च कसा करणार ?

श्रुतीला पुन्हा हात मिळण्यासाठी पित्याची धडपड; प्रत्यारोपण शक्य, पण खर्च कसा करणार ?

छत्रपती संभाजीनगर : दररोज कमावून कुटुंबाचा उदरनिर्वाह करणाऱ्या व्यक्तीला हातावर पोट असणारे म्हणतात. अशाच एका व्यक्तीच्या कुटुंबातील श्रुती गंगाधर रोडगे या सात वर्षांच्या चिमुकलीचे अपघातात दोन्ही हातच गेले. आता तिला प्रत्यारोपणातून किमान एक हात तरी मिळावा, यासाठी तिचे वडील धडपडत आहेत. मात्र, त्यासाठी येणारा खर्च करणे अशक्य असल्याने हा पिता हतबल आहे.

गंगाधर बालाजी रोडगे (रा. महागाव, ता. पूर्णा, जि. परभणी) असे या पित्याचे नाव आहे. खासगी वाहन चालक असलेले गंगाधर यांना श्रुतीसह दोन मुली आणि एक मुलगा आहे. जानेवारी २०२१ मध्ये त्यांची मुलगी श्रुती ही घराच्या छतावर खेळत होती. तिच्या हातातील राॅडचा विद्युत वाहिन्यांना धक्का लागला आणि त्यात तिचे दोन्ही हात भाजले. दुर्दैवाने तिचे दोन्ही हात काढावे लागले. ज्या हातांनी श्रुती भातुकली खेळत होती, लिहिणे शिकत होती, ते हातच आता कायमचे गेल्याने कुटुंबीयांची चिंता वाढली. मात्र, प्रत्यारोपणाच्या माध्यमातून हात मिळू शकतात, अशी महिती गंगाधर यांना मिळाली. अनेक ठिकाणी गेल्यानंतर अखेर उदयपूर (राजस्थान) येथे हाताचे प्रत्यारोपण होऊ शकते, असे त्यांना कळाले. त्या ठिकाणी ते गेले, तेव्हा श्रुतीच्या डाव्या हाताचे प्रत्यारोपण होऊ शकत असल्याचे सांगण्यात आले. प्रत्यारोपणासाठी हात कधीही मिळू शकताे. मात्र, त्यासाठी येणारा तीन ते चार लाखांचा खर्च कसा करावा, असा प्रश्न रोडगे यांच्यापुढे आहे. श्रुतीला हात मिळण्यासाठी ‘मदतीचा हात’ मिळण्याची ते प्रतीक्षा करीत आहेत.

पुन्हा लिहिता येईल
किमान एक हात मिळाल्यानंतर पुन्हा लिहिता येईल, अशी आशा श्रुती व्यक्त करते. गंगाधर रोडगे यांनी ‘लोकमत’कडे श्रुतीची परिस्थिती सांगून समाजातील दानशूरांनी मदतीचा हात देण्याचे आवाहन केले आहे.

Web Title: Father's struggle to regain Shruti's hand; Transplant possible, but how to spend?

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.