पोलिसांकडून 'टिपले' जाण्याची भीती; कुख्यात टिप्या न्यायालयासमोर हजर
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 28, 2021 07:21 PM2021-09-28T19:21:41+5:302021-09-28T19:22:44+5:30
दोन पोलिसांना खेटणाऱ्या टिप्याला तातडीने बेड्या घाला, असा आदेश पोलीस आयुक्तांनी गुन्हे शाखेसह पुंडलिकनगर पोलिसांना दिला.
औरंगाबाद : पोलीस अधिकाऱ्याच्या अंगावर जीप घालून जिवे मारण्याचा प्रयत्न, कारागृह पोलिसाला धमकावून खंडणी उकळणारा कुख्यात गुन्हेगार टिप्या ऊर्फ शेख जावेद शेख मकसूद (रा. विजयनगर, गारखेडा परिसर) मंगळवारी दुपारी न्यायालयात हजर झाला. त्याने नाट्यमयरित्या केलेल्या शरणागती मागे पोलिसांकडून 'टिपले' जाण्याची भीती असल्याचे बोलले जात आहे.
दोन पोलिसांना खेटणाऱ्या टिप्याला तातडीने बेड्या घाला, असा आदेश पोलीस आयुक्तांनी गुन्हे शाखेसह पुंडलिकनगर पोलिसांना दिला. गुन्हे शाखेसह ठाण्यांची पथके त्याचा घेत होती. मालेगावातील कुख्यात गुंड मेहताबच्या फार्म हाउसवरही पोलिसांनी धाड टाकली होती. तेथेही तो सापडला नव्हता. शहरात त्याची बहीण, आईच्या हालचालींवरही पोलिसांची नजर होती. १० दिवसांनंतरही पोलीस त्याला पकडू शकले नव्हते. मंगळवारी सकाळी ११.३० ते १२ वाजेदरम्यान तो आईसह नाट्यमयरीत्या न्यायालयासमोर हजर झाला. पोलीस माझा एन्काउंटर करतील, अशी भीती त्याने व्यक्त केल्याने न्यायालयाने त्याची रवानगी ३० सप्टेंबरपर्यंत न्यायालयाीन कोठडीत हर्सूलला केली.