जेष्ठ डॉक्टर, आरोग्य कर्मचाऱ्यांत कोरोना लसीची भीती; पहिल्याऐवजी तिसऱ्या टप्प्यात लस घेण्याची मानसिकता
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 4, 2021 02:41 PM2021-01-04T14:41:25+5:302021-01-04T14:42:53+5:30
Fear of corona vaccine among senior doctors, health workers : कोरोना प्रतिबंधात्मक लस केवळ आरोग्यसंबंधित डॉक्टर, आरोग्य कर्मचाऱ्यांना पहिल्या टप्प्यात दिली जाणार आहे.
- संतोष हिरेमठ
औरंगाबाद : अवघ्या देशवासीयांचे कोरोना लसीकडे डोळे लागले आहेत. या महामारीला संपविण्यासाठी लसीकडे वैद्यकीय शस्त्र म्हणून पाहिले जात आहे; मात्र लसीकरणानंतर शरीरावर काही परिणाम होईल का, ही भीती सध्या ५० वर्षांवरील डॉक्टर, आरोग्य कर्मचाऱ्यांना सतावत आहे. त्यातूनच पहिल्या टप्प्याऐवजी तिसऱ्या टप्प्यांत म्हणजे ५० वर्षांवरील नागरिकांच्या लसीकरणादरम्यान लस घेण्याची मानसिकता वाढत आहे.
कोरोना प्रतिबंधात्मक लस केवळ आरोग्यसंबंधित डॉक्टर, आरोग्य कर्मचाऱ्यांना पहिल्या टप्प्यात दिली जाणार आहे. गेल्या वर्षभर कोरोनायुद्ध लढणाऱ्या आरोग्य कर्मचाऱ्यांना प्रथम लस मिळणार असल्याने समाधान व्यक्त आहे. परंतु, ५० वर्षांवरील डॉक्टर, आरोग्य कर्मचाऱ्यांना वेगळीच चिंता सतावत आहे. यातील अनेकांना मधुमेह, हृदयविकार, उच्च रक्तदाब, आदी आजार आहेत. त्यातून काही दुष्परिणाम होण्याची चिंता व्यक्त केली जात आहे. त्यामुळे पहिल्या टप्प्याऐवजी तिसऱ्या टप्प्यात लस घेण्यास प्राधान्य देऊ, असे मत ५० वर्षांवरील डॉक्टर, आरोग्य कर्मचारी वरिष्ठांकडे व्यक्त करीत आहेत.
वरिष्ठांनी निर्माण करावा विश्वास
लसीबाबतचा गैरसमज, चुकीची माहिती आणि त्यामुळे निर्माण झालेली भीती यामुळे लसीकरणाबाबतची उदासीनता वाढीला लागते. कोणत्याही गैरसमजांना खतपाणी मिळू नये यासाठी लसीकरणाच्या प्राथमिक टप्प्यापासून ही उदासीनता घालविण्यासाठी प्रयत्न होणे गरजेचे आहे. लस टोचून घ्यावी यासाठी लसीबाबत मनात विश्वास निर्माण करणे गरजेचे आहे. त्यासाठी वरिष्ठ आरोग्य अधिकाऱ्यांनी प्रारंभी लस घेऊन हा विश्वास निर्माण करण्याची गरज आहे.
अर्धा तास ठेवणार लक्ष
लसीकरण केंद्रावर लस घेतल्यानंतर पुढील अर्धा तास लसीचे परिणाम पाहण्यासाठी व्यक्तीला तेथे थांबविण्यात येणार आहे. त्यामुळे कोणतीही काळजी करण्याची गरज नसल्याचे आरोग्य अधिकाऱ्यांचे म्हणणे आहे.
लस ही फायदेशीरच
नियोजित टप्प्यांनुसार लसीकरण पार पाडले जाणार आहे. लसीविषयी कोणत्याही प्रकारे भीतीचे वातावरण नाही. ब्रिटनमध्ये सापडलेल्या कोरोनाच्या नव्या स्ट्रेनवरही लस फायदेशीर ठरणार आहे.
- डॉ. सुंदर कुलकर्णी, जिल्हा शल्यचिकित्सक
‘आयएमए’तर्फे आवाहन
काही प्रमाणात डॉक्टर, आरोग्य कर्मचाऱ्यांत लसीची भिती आहे. लसीकरणानंतर जेव्हा लोक ठणठणीत दिसतील, तेव्हा ही भीती आपोआप दूर होईल. लस घेणे हे बंधनकारक नाही; पण नोंदणी करणे बंधनकारक आहे. ज्यांनी नोंदणी केलेली नाही, अशांना नोंदणी करण्याचे आवाहन ‘आयएमए’तर्फे केले जात आहे.
- डॉ. संतोष रंजलकर, अध्यक्ष, इंडियन मेडिकल असोसिएशन (आयएमए)