कोरोनाच्या नवीन विषाणूची भीती; ब्रिटन येथून आलेल्या ७ नागरिकांची तपासणी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 23, 2020 01:08 PM2020-12-23T13:08:23+5:302020-12-23T13:10:49+5:30
मंगळवारी तातडीने ९ नागरिकांचा शोध लावण्यात महापालिकेला यश आले.
औरंगाबाद : ब्रिटनमध्ये नवीन विषाणूने कहर करण्यास सुरुवात केली आहे. महाराष्ट्र शासनाने खबरदारीसाठी रात्रीची संचारबंदी लागू केली आहे. औरंगाबाद शहरात ब्रिटन येथून एकूण ९ नागरिक दाखल झाले. त्यापैकी ७ जण शहरात वास्तव्याला आहेत. महापालिकेने मंगळवारी सातही नागरिकांची कोरोना तपासणी केली. बुधवारी त्यांचा अहवाल प्राप्त होईल, अशी माहिती आरोग्य वैद्यकीय अधिकारी नीता पाडळकर यांनी दिली.
कोरोना संसर्गामुळे संपूर्ण जग त्रस्त असताना ब्रिटनमध्ये नवीन विषाणूने जन्म घेतला आहे. कोरोनापेक्षा हा विषाणू ७० पटीने वेगाने पसरत असल्याच्या बातम्या झळकत आहेत. महाराष्ट्र शासनाने खबरदारीचा उपाय म्हणून राज्यातील सर्व महापालिका हद्दीमध्ये रात्रीची संचारबंदी लावण्याचा निर्णय घेतला. या निर्णयाची अंमलबजावणी सोमवारी मध्यरात्रीपासून सुरू झाली आहे. अशा परिस्थितीत औरंगाबाद शहरात मागील काही दिवसांमध्ये ब्रिटन येथून नऊ नागरिक आले आहेत. त्यामुळे औरंगाबाद महापालिकेच्या आरोग्य विभागाची यंत्रणा खडबडून जागी झाली. विमानतळावरूनही माहिती मिळविण्यात आली.
ब्रिटन येथून परतलेले हे नागरिक सध्या कुठे आहेत, त्याचा शोध सुरू झाला. मंगळवारी तातडीने ९ नागरिकांचा शोध लावण्यात महापालिकेला यश आले. एक नागरिक औरंगाबाद विमानतळावरून बुलडाणाकडे रवाना झाले. दुसरा नागरिक वाळूज परिसरात राहत आहे. उर्वरित ७ नागरिक शहरात वास्तव्याला आहेत. त्यांच्या लाळेचे नमुने घेण्यात आले आहेत. बुधवारी यासंबंधीचा अहवाल महापालिकेला प्राप्त होईल, अशी माहिती पाडळकर यांनी दिली.