अकरावीमुळे बारावीचे गुणांकण घसरण्याची भीती

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 4, 2021 04:04 AM2021-07-04T04:04:01+5:302021-07-04T04:04:01+5:30

औरंगाबाद : राज्य शिक्षण मंडळाकडून घेतल्या जाणाऱ्या इयत्ता बारावी परीक्षेचे गुणदान दहावी, अकरावी आणि बारावीच्या अंतर्गत परीक्षांच्या आधारे केले ...

Fear of dropping the coefficient of XII due to XI | अकरावीमुळे बारावीचे गुणांकण घसरण्याची भीती

अकरावीमुळे बारावीचे गुणांकण घसरण्याची भीती

googlenewsNext

औरंगाबाद : राज्य शिक्षण मंडळाकडून घेतल्या जाणाऱ्या इयत्ता बारावी परीक्षेचे गुणदान दहावी, अकरावी आणि बारावीच्या अंतर्गत परीक्षांच्या आधारे केले जाणार आहे. अनेक विद्यार्थी अकरावीला हे रेस्ट इअर समजतात, तर बारावीपेक्षा विविध अभ्यासक्रमांच्या प्रवेश पूर्व परीक्षांच्या तयारीवर लक्ष केंद्रित करतात. त्या विद्यार्थ्यांसह पालक, शिक्षकांत अकरावीच्या मूल्यमापनावरून धाकधूक आहे. अकरावीमुळे बारावीचे गुणांकन घसरण्याची भीती तज्ज्ञांकडून व्यक्त होत आहे.

जिल्ह्यात ४२६ पैकी ११६ शाळा, महाविद्यालये शहरात आहेत. शहरातील ४८ टक्के जागा रिक्त राहून विद्यार्थी ग्रामीण भागात प्रवेशित होऊन नीट, जेईई, सीईटी अशा विविध अभ्यासक्रमांच्या प्रवेशपूर्व परीक्षांची तयारी शहरात येऊन करताना अकरावीला दुर्लक्ष होते, तर अनेकजण रेस्ट इअर समजून बारावीकडे लक्ष केंद्रित करतात परिणामी दहावीपेक्षा अकरावीत गुण कमी मिळतात. आता त्यात गुणांचे ३० टक्के गुण मूल्यमापनात ग्राह्य धरले जाणार आहेत. त्यामुळे अशा विद्यार्थ्यांनी मूल्यांकनाच्या नव्या सूत्राची धास्ती घेतली आहे. यात अभ्यासू विद्यार्थ्यांचे नुकसान होणार असल्याची भीतीही शिक्षकांतून व्यक्त केली जात आहे.

जिल्ह्यातून बारावीच्या परीक्षेसाठी यावर्षी ५२ हजार ५७५ विद्यार्थ्यांसह २५९६ पुनर्परीक्षार्थींनी अर्ज भरले आहेत. ऑनलाइनमध्ये वर्षभर बारावीची ६० ते ७० टक्क्यांपेक्षा अधिक उपस्थिती नव्हती, तर प्रत्यक्ष वर्गातही ६० टक्क्यांपर्यंतच उपस्थिती दिसून न आल्याने शाळा महाविद्यालयांच्या संपर्कात न आलेल्या विद्यार्थ्यांचे बारावीचे मूल्यांकन कसे होईल, याबद्दलही विद्यार्थी व पालकांत संभ्रमाचे वातावरण आहे.

--

५५,१७७

बारावीतील विद्यार्थी

---

बारावीला अंतर्गत गुणांचे असे होणार मोजमाप

-बारावीचे अंतर्गत मूल्यमापन करताना ज्या कनिष्ठ महाविद्यालय, शाळांनी तोंडी, प्रात्यक्षिक, अंतर्गत, तत्सम परीक्षा आयोजित केल्या नसतील. त्यांनी ऑनलाइन किंवा शक्य त्या पर्यायी मूल्यमापन पद्धतीने आयोजित करून गुणदान करावे, अशी सूचना मंडळाने दिली आहे.

-उत्तीर्ण झाल्यानंतर शाखा बदलून अन्य शाळेत बदल केला असल्यास त्या विद्यार्थ्याला अकरावी व बारावीमधील समान विषयांची सरासरी विचारात घेऊन १०० पैकी गुण देेण्याच्या कार्यवाहीच्या सूचना देण्यात आल्या आहेत.

-----

अकरावी तर रेस्ट इअर

-राज्य शिक्षण मंडळाने अकरावीच्या गुणांना सीबीएसईप्रमाणे ३० टक्के वेटेज दिले तर अंतिम गुणांकनात घसरण होण्याची भीती विद्यार्थ्यांमध्ये आहे.

-अकरावी परीक्षेच्या काळात अभ्यासक्रम पूर्ण न झाल्याने स्वाध्याय, गृहपाठ, चाचण्या यांच्याकडे लक्ष न दिल्याने ते रेस्ट इअर म्हणून गेल्याचे विद्यार्थ्यांचे म्हणणे आहे.

-----

असे होणार बारावीचे मूल्यांकन

---

दहावीच्या परीक्षेतील सर्वाधिक गुण मिळालेल्या तीन विषयांच्या सरासरी गुणांचे ३० टक्के, अकरावीच्या अंतिम निकालातील विषयनिहाय गुणांचे ३० टक्के आणि बारावीच्या वर्षभरातील सत्र परीक्षा, सर्व चाचण्या, अंतर्गत परीक्षांच्या विषयनिहाय गुणांच्या ४० टक्के गुणांचा अंतर्भाव असणार आहे.

--

अकरावीला ३० टक्के वेटेजने वाढवली चिंता

--

-दहावीला ३०, अकरावीला ३० तर बारावीला ४० टक्के असे मूल्यांकन होणार असल्याने यात दहावीला अधिक तर अकरावीला कमी वेटेज देणे अपेक्षित होते. अकरावी रेस्ट इअर म्हणून दुर्लक्ष केलेल्या विद्यार्थ्यांच्या गुणांच्या घसरणीची भीती पालकांतून व्यक्त होत आहे.

-या कार्यपद्धतीने जाहीर केलेल्या निकालाने समाधान होणार नाही. त्या विद्यार्थ्यांना कोरोनाचे सावट निवळल्यावर राज्य शिक्षण मंडळाकडून प्रचलित पद्धतीनुसार घेतल्या जाणाऱ्या परीक्षांमध्ये श्रेणीसुधार अंतर्गत दोन संधी उपलब्ध करून देण्यात येणार आहेत.

----

विद्यार्थ्यांना भविष्याची चिंता ...

---

जेईईची परीक्षा डोळ्यांसमोर ठेवून अकरावीच्या सुरुवातीपासून तयारीला लागलो. त्यामुळे बोर्ड परीक्षा व जेईईच्या अभ्यासात अकरावी दुर्लक्षित राहिली. बारावीचे वर्ष कोरोनात गेले. आता या फाॅर्म्युल्याने गुण कमी मिळण्याची शक्यता आहे.

-तुषार काळे, बारावी विद्यार्थी, देवगिरी महाविद्यालय, औरंगाबाद

---

फाॅर्म्युला ठरला, हे एका दृष्टीने चांगले झाले. लवकर निकाल लागेल. नीटच्या तयारीत अकरावी दुर्लक्षित झाली. त्याचा परिणाम या गुणांच्या सूत्राने निकालावर होईल; पण हरकत नाही. सेल्फ स्टडी केलेली आहे. नीट परीक्षेच्या स्कोअरवर लक्ष केंद्रित केले आहे.

-पूजा मानकापे, बारावीची विद्यार्थिनी, जि. प. प्रशाला, जातेगाव

---

दहावीत मेरिट असूनही अकरावीत कमी गुण असल्यास नुकसान

बारावीच्या सर्व शाखांचे मूल्यांकन सूत्र किचकट असले तरी अडचण येणार नाही. अकरावी रेस्ट इअर आणि कोरोनामुळे गेलेले बारावीचे वर्ष त्याचा निकालाच्या वस्तुनिष्ठतेवर परिणाम होणार आहे. मात्र, प्राप्त परिस्थितीतून मार्ग काढण्यासाठी झालेला निर्णय योग्य आहे.

-अनिल देशमुख, मुख्याध्यापक, जि. प. प्रशाला गणोरी

----

ऑनलाइन आणि प्रत्यक्ष वर्ग सुरू असतानाही कोरोना आणि तांत्रिक अडचणीमुळे ४० टक्के विद्यार्थी महाविद्यालयाच्या संपर्कात राहिले नाहीत. त्यात अकरावी रेस्ट इअर म्हणून ग्राह्य धरून विद्यार्थी बारावी आणि पुढील परीक्षांच्या तयारीत असतात. दहावीत मेरिटमध्ये असताना अकरावीचे ३० टक्के वेटेज प्रामुख्याने विज्ञान शाखेच्या विद्यार्थ्यांच्या निकालावर घसरणीला कारणीभूत ठरेल. तसेच दरवर्षीपेक्षा कला आणि वाणिज्य शाखांचेही मेरिट घसरेल.

-रजनिकांत गरुड, उपप्राचार्य, देवगिरी महाविद्यालय, औरंगाबाद

Web Title: Fear of dropping the coefficient of XII due to XI

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.