भावी सरपंचांची धाकधूक वाढली; नवीन आरक्षण सोडतीमुळे मातब्बरांचा जीव टांगणीला
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 27, 2021 04:16 PM2021-01-27T16:16:22+5:302021-01-27T16:18:36+5:30
श्रीमंत ग्रामपंचायतीवर वर्चस्व प्रस्थापित करण्यासाठी महाविकास आघाडी व भाजपने संपूर्ण ताकद पणाला लावली होती.
वाळूज महानगर : सरपंचपदाच्या नवीन आरक्षण सोडतीमुळे गावपातळीवरील मातब्बरांचा जीव टांगणीला लागला आहे. पूर्वीचे आरक्षण कायम राहते की नवीन आरक्षण आरक्षण निघते यामुळे उद्योगनगरीतील २१ ग्रामपंचायतींच्या ‘भावी’ सरपंचाची धाकधूक वाढली आहे.
वाळूज व एमआयडीसी हद्दीतील २१ ग्रामपंचायतींच्या निवडणुका नुकच्याच पार पडल्या असून, निकालही जाहीर झाला आहेत. मात्र, शासनाच्या वतीने पूर्वी जाहीर करण्यात आलेल्या सरपंचपदाचे आरक्षण रद्द करून निकालानंतर नव्याने आरक्षण जाहीर करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. त्यामुळे गावपातळीवरील पदाधिकाऱ्यांना रणनीतीत बदल करावा लागला. या श्रीमंत ग्रामपंचायतीवर वर्चस्व प्रस्थापित करण्यासाठी महाविकास आघाडी व भाजपने संपूर्ण ताकद पणाला लावली होती. यंदाच्या निवडणुकीत रांजणगावात आ. प्रशांत बंब, पंढरपुरात जि.प. सदस्य रमेश गायकवाड, पं.स. सदस्य शममबी चौधरी, माजी सरपंच शेख अख्तर, तर तीसगावात माजी जि.प. सदस्य रामचंद्र कसुरे, नारायणपुरात माजी सरपंच नासेर पटेल, अंबेलोहळमध्ये मनसेचे दिलीप पा. बनकर यांनी बहुमत मिळविले आहे.
वळदगाव ग्रामपंचायतीची निवडणूक बिनविरोध झाली असून, आदर्श पाटोदा गावात सत्तांतरण झाले आहे. मात्र, जोगेश्वरी व वाळूज येथे त्रिशंकू अवस्था असल्याने या दोन ग्रामपंचायतींची सत्ता ताब्यात घेण्यासाठी मातब्बर राजकीय पदाधिकाऱ्यांनी प्रतिष्ठा पणाला लावली आहे. सरपंचपदाच्या निवडणुकीत ऐनवेळी दगा फटका होऊ नये, यासाठी वाळूज व जोगेश्वरी येथील नवनिर्वाचित ग्रामपंचायत सदस्यांना सहलीसाठी अज्ञातस्थळी रवाना करण्यात आले आहे. रांजणगाव, तीसगाव व पंढरपुरात सरपंचपदासाठी जुन्या व नवीन पदाधिकाऱ्यांत रस्सीखेच सुरू आहे.
असे होते पूर्वीचे आरक्षण
रांजणगावात गत पंचवार्षिकला एससी महिला, वाळूजला एससी पुरुष, नारायणपुरात ओबीसी महिला, जोगेश्वरी, वळदगाव, पंढरपूर, पाटोदा सर्वसाधारण असे आरक्षण होते. आता २९ जानेवारी रोजी होणाऱ्या आरक्षण सोडतीमुळे भावी सरपंचांची धाकधूक वाढली आहे. नवीन आरक्षण सोडतीत सरपंचपदाची लॉटरी कुणाला लागते, याकडे वाळूजमहानगरवासीयांचे लक्ष लागले आहे.