औरंगाबाद शहरात होर्डिंग, मोबाईल टॉवर, कमानी कोसळण्याची भीती
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 6, 2018 10:49 PM2018-10-06T22:49:03+5:302018-10-06T22:50:20+5:30
शहरातील प्रमुख रस्ते, गर्दीच्या ठिकाणी महापालिकेने मोठमोठे लोखंडी होर्डिंग, कमानी उभारल्या आहेत. या होर्डिंगपोटी महापालिकेला कमी आणि खाजगी एजन्सींना मोठ्या प्रमाणात महसूल मिळतो. शुक्रवारी पुण्यात लोखंडी होर्डिंग रस्त्यावर कोसळून चार निष्पाप नागरिकांचा जीव गेला. या घटनेनंतर औरंगाबाद महापालिकेने सर्व होर्डिंगच्या तपासणीची घोषणा शुक्रवारी केली. शनिवारी एकाही होर्डिंगची तपासणी केली नाही. ‘लोकमत’च्या प्रतिनिधीने शहरातील विविध होर्डिंगची पाहणी केली असता अनेक होर्डिंग धोकादायक असल्याचे दिसून आले.
औरंगाबाद : शहरातील प्रमुख रस्ते, गर्दीच्या ठिकाणी महापालिकेने मोठमोठे लोखंडी होर्डिंग, कमानी उभारल्या आहेत. या होर्डिंगपोटी महापालिकेला कमी आणि खाजगी एजन्सींना मोठ्या प्रमाणात महसूल मिळतो. शुक्रवारी पुण्यात लोखंडी होर्डिंग रस्त्यावर कोसळून चार निष्पाप नागरिकांचा जीव गेला. या घटनेनंतर औरंगाबाद महापालिकेने सर्व होर्डिंगच्या तपासणीची घोषणा शुक्रवारी केली. शनिवारी एकाही होर्डिंगची तपासणी केली नाही. ‘लोकमत’च्या प्रतिनिधीने शहरातील विविध होर्डिंगची पाहणी केली असता अनेक होर्डिंग धोकादायक असल्याचे दिसून आले.
शहरात महापालिकेने ४६० पेक्षा अधिक मोठमोठे लोखंडी होर्डिंग उभारले आहेत. काही वर्षांसाठी सर्व होर्डिंग खाजगी एजन्सी चालकांना देण्यात आले आहेत. मागील अनेक वर्षांमध्ये या होर्डिंगची तपासणीच करण्यात आलेली नाही. पुण्याच्या घटनेनंतर महापौर नंदकुमार घोडेले यांनी शहरातील सर्व होर्डिंगची तपासणी करण्याचे आदेश प्रशासनाला दिले. या आदेशाचे रूपांतर कृतीत अजिबात झाले नाही. उलट प्रशासनाने ही जबाबदारी खाजगी एजन्सी चालकांवर ढकलून दिली. त्यांनीच प्रत्येक होर्डिंगचे स्ट्रक्चरल आॅडिट करून आणून महापालिकेला द्यावे. उद्या शहरातील प्रमुख रस्त्यांवर होर्डिंगचा लोखंडी ढाचा, स्वागत कमानी दुर्दैवाने कोसळल्या, तर त्याला जबाबदार कोण? याचे उत्तर प्रशासनाकडे नाही.
धोका डोक्यावर तरी...
महापालिकेने कोट्यवधी रुपये खर्च करून लोखंडी होर्डिंग उभारले आहेत. ज्या दिवशी महापालिकेने हे काम केले तेव्हापासून आजपर्यंत होर्डिंगच्या लोखंडी रॉड कुठे गंजून खराब झालेत का? हे पाहण्याची तसदी घेतली नाही. सेव्हन हिल येथे सर्वाधिक होर्डिंग आहेत. पावसाच्या पाण्याने यातील काही होर्डिंगचे रॉड गंजले तरी प्रशासन याकडे लक्ष द्यायला तयार नाही. औरंगपुऱ्यातील लोखंडी स्वागत कमान एकाच बाजूने उभी आहे. ती सुद्धा वजनाने एका बाजूने वाकली आहे. दुसºया बाजूची कमान मोडकळीस आल्याने काढून टाकण्यात आली. या कमानीखाली २४ तास वैकुंठधामापर्यंत पोहोचवणारा स्वर्गरथ उभा असतो. अशीच अवस्था निराला बाजार, सिल्लेखान्यात पाहायला मिळाली. रेल्वे प्रशासनानेही स्वागत कमान उभारली आहे. या लोखंडी कमानीची अवस्था पाहण्यासाठी रेल्वे प्रशासनाकडे अजिबात वेळ नाही. जालना रोडवरील अमरप्रीत सिग्नलवरही लोखंडी कमानीची अवस्था वाईटच आहे.
मोबाईल टॉवरही धोकादायक
शहरात ३०० पेक्षा अधिक अनधिकृत मोबाईल टॉवर उभारण्यात आले आहेत. इमारतींची क्षमता नसतानाही लाखो टन वजनाचे मोठमोठे टॉवर उभारण्यात आले आहेत. वादळ-वारा आल्यावर हे टॉवर इमारतीसह कोसळतात की काय? अशी भीती निर्माण होत आहे. कोणत्या इमारतीवर मोबाईल टॉवर बसविणे शक्य आहे, याचा अहवाल महापालिकाच देऊ शकते.