बिबट्याच्या दहशतीने गोदाकाठ परिसरात शेतीची कामे प्रभावीत

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 1, 2020 06:05 PM2020-12-01T18:05:20+5:302020-12-01T18:07:51+5:30

लोहगाव परिसरात मंगळवारी दुपारी शेतात बिबट्या दिसल्याची माहिती

Fear of leopards affects farming activities in Godakath area | बिबट्याच्या दहशतीने गोदाकाठ परिसरात शेतीची कामे प्रभावीत

बिबट्याच्या दहशतीने गोदाकाठ परिसरात शेतीची कामे प्रभावीत

googlenewsNext
ठळक मुद्देपाच पिंजरे व ९ ट्रप कँमेरे लावून बिबट्याला जेरबंद करण्यासाठी वनखाते प्रयत्नशील बिबट्याच्या दहशतीने गोदाकाठ परिसरात शेतीची कामे प्रभावीत झाली आहेत

पैठण : गेल्या १५ दिवसा पासून पैठण तालुक्यातील नरभक्षक बिबट्याच्या मागावर असलेल्या वनखात्याच्या अधिकाऱ्यांना बिबट्यास  पिंजऱ्यात बंद करण्यात अद्याप यश आलेले नाही. बिबट्याच्या  दहशतीने गोदाकाठ परिसरात शेतीची कामे प्रभावीत झाली असून शेतकऱ्यानी बिबट्याच्या  धास्ती घेतली आहे. दुसरीकडे पाच पिंजरे व ९ ट्रप कँमेरे लावून बिबट्याला जेरबंद करण्यासाठी वनखाते प्रयत्नशील आहे. परंतु बिबट्या त्यांना हुलकावणी देण्यात यशस्वी होत आहे.

बिबट्याला पिंजऱ्यात कैद करण्यासाठी वनखात्याने २८ वनरक्षकाचे पथक तालुक्यात तैनात केले आहे. आपेगाव येथे ज्या शेतात हल्ला करून बिबट्याने पीता पुत्रास ठार केले होते त्या ठिकाणी पिंजरा लावण्यात आला आहे. याशिवाय परिसरात अन्य ठिकाणी ४ पिंजरे ठेवण्यात आले आहेत. वाघाडी, आपेगाव, नायगाव शिवारात ९ ट्रँप कँमेरे बसविण्यात आले आहे. वनरक्षकांची गस्त सुरू आहे. परंतु बिबट्या काही वनखात्याच्या निदर्शनास अद्याप पडलेला नाही.

पैठण तालुक्यातील गोदाकाठच्या गावात नरभक्षक  बिबट्याच्या रूपाने साक्षात काळ फिरत असल्याने शेतीचे उद्योग थांबले आहेत. आपेगाव येथील अशोक औटे व त्यांचा मुलगा कृष्णा या पितापुत्राचा त्यांच्याच शेतात दि १६ नोहेंबर रोजी बिबट्याने फडशा पाडल्यानंतर परिसरातील शेतकरी बीबट्याच्या दहशतीखाली वावरत आहेत. शेतकऱ्यांना जीव मुठीत धरून काम करावे लागत आहे.नरभक्षक बिबट्याच्या दहशतीने गोदाकाठचा शेतशिवार दुपारीच निर्मनुष्य  होत आहे. उसतोड मजुरांनी उसाचे फड सोडल्याने शेतकरी हवालदिल झाले आहे. परिसरातील ऊस मशीनने तोडावा अशी मागणी शेतकऱ्यांनी केली आहे.

पिकांना पाणी देण्यासाठी दिवसा विद्युत पुरवठा करण्यात यावा अशी मागणी आपेगाव जी प सदस्या शिल्पा ज्ञानेश्वर कापसे यांनी केली आहे. लोहगाव परिसरात मंगळवारी दुपारी शेतात बिबट्या दिसल्याचा वनरक्षक राजू जाधव यांना फोन आल्याने सायंकाळी वनरक्षकाचे पथक लोहगाव परिसरात रवाना झाले आहेत. तालुक्यात अनेक ठिकाणी ग्रमस्थांना बीबट्याने दर्शन दिल्याने सध्यातरी तालुक्यात बीबट्याच्या दहशतीने घर केले आहे.बीबट्यास जेरबंद करण्यासाठी वनखात्याने यंत्रणा वाढवावी अशी मागणी होत आहे.

Web Title: Fear of leopards affects farming activities in Godakath area

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.