‘रेमडेसिविर’साठी गरजूंचे हाल होण्याची भीती
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 28, 2021 04:04 AM2021-04-28T04:04:02+5:302021-04-28T04:04:02+5:30
औरंगाबाद : खाजगी रुग्णालयांतील रुग्णांपाठोपाठ आता घाटीतील गरजू रुग्णांचे रेमडेसिविर इंजेक्शनसाठी हाल होण्याची भीती व्यक्त होत आहे. कारण घाटीत ...
औरंगाबाद : खाजगी रुग्णालयांतील रुग्णांपाठोपाठ आता घाटीतील गरजू रुग्णांचे रेमडेसिविर इंजेक्शनसाठी हाल होण्याची भीती व्यक्त होत आहे. कारण घाटीत इंजेक्शनचा साठा बुधवारपर्यंत पुरेल इतकाच आहे. तर जिल्हा रुग्णालयात ३ दिवस पुरतील एवढीच इंजेक्शन्स उपलब्ध आहेत.
घाटी रुग्णालयात रेमडेसिविर इंजेक्शनचा साठा संपत आला असून, मंगळवारपासून दीड दिवस पुरतील, इतक्या रेमडेसिविरची उपलब्धता असल्याची माहिती घाटी प्रशासनातर्फे देण्यात आली. घाटी रुग्णालयात मराठवाड्यासह ठिकठिकाणांहून रुग्ण दाखल होतात. प्रत्येक रुग्णाला भरती केले जात आहे. त्यामुळे रुग्णांना दिलासा मिळत आहे. खाजगी रुग्णालयांतील रुग्णांसह अन्य जिल्ह्यातील रुग्ण घाटीत दाखल होत आहेत. कारण घाटीत रेमडेसिविर इंजेक्शन उपलब्ध होतात. परंतु घाटीत आता रुग्णांची दरदिवशी वाढती संख्या पाहता रेमडेसिविरचीही मागणी वाढली आहे. घाटीत रोज तीनशे ते साडेतीनशे रेमडेसिविर इंजेक्शन रुग्णांना लागतात. परंतु आता दीड दिवसाचाच साठा असल्याची माहिती अधिष्ठाता डॉ. कानन येळीकर यांनी दिली. इंजेक्शनचा पुरवठा झाला नाही, तर इंजेक्शनसाठी भटकंती करण्याची वेळ घाटीत दाखल रुग्णांच्या नातेवाइकांवर ओढवण्याची शक्यता नाकारता येत नाही.
‘सिव्हिल’चा साठा संपण्याच्या मार्गावर
जिल्हा रुग्णालयात सध्या ३ दिवस पुरतील, एवढीच इंजेक्शन उपलब्ध आहेत, अशी माहिती जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. एस. व्ही. कुलकर्णी यांनी दिली. जिल्हा रुग्णालयातही रेमडेसिविर इंजेक्शन मिळण्याच्या दृष्टीने अन्य जिल्ह्यातील रुग्ण दाखल होत आहेत. परिणामी, येथील इंजेक्शनचा साठाही संपण्याच्या मार्गावर आहे.