पशुपालकांनो घाबरू नका, काळजी घ्या! ‘लम्पी’चा नवा स्ट्रेन, बाधा फक्त गोवंश जनावरांनाच

By विजय सरवदे | Published: October 8, 2022 07:59 PM2022-10-08T19:59:59+5:302022-10-08T20:00:31+5:30

साथ आटोक्यात आणण्यासाठी पशुसंवर्धन विभाग सक्रीय

Fear not, beware, new strain of 'lumpy'; Obstacle only to bovine animals | पशुपालकांनो घाबरू नका, काळजी घ्या! ‘लम्पी’चा नवा स्ट्रेन, बाधा फक्त गोवंश जनावरांनाच

पशुपालकांनो घाबरू नका, काळजी घ्या! ‘लम्पी’चा नवा स्ट्रेन, बाधा फक्त गोवंश जनावरांनाच

googlenewsNext

औरंगाबाद : ‘लम्पी’ हा केवळ गोवंश जनावरांनाच होणारा विषाणूजन्य त्वचारोग आहे. हा आजार जनावरांपासून माणसाला संक्रमित होत नाही. आतापर्यंत या रोगामुळे जिल्ह्यातील ७७ जनावरे मृत्युमुखी पडली असून ही साथ आटोक्यात आणण्यासाठी पशुसंवर्धन विभाग कसोसीने प्रयत्न करीत आहे. हा आजार फक्त गाय, बैल किंवा वासरांनाच होतो. म्हैस, शेळी, मेंढी किंवा अन्य पाळीव जनावरांना होत नाही. त्यामुळे पशुपालकांनी घाबरून न जाता खबरदारी घ्यावी, असे आवाहन जि.प. पशुसंवर्धन विभागाने केले आहे.

या आजारात गोवंश जनावरांना अगोदर ताप येतो. त्यांचे खाण्याचे प्रमाण कमी होते. दूध देणाऱ्या जनावरांचे दूध कमी होते. तसेच कष्टाळू म्हणजे बैलासारख्या प्राण्यांना अशक्तपणा येतो. अनेकदा जनावरे लंगडतात. त्यानंतर पाच ते सहा दिवसानंतर जनावरांच्या अंगावर मोठ्या गाठी येतात. या गाठी कासेला मानेवरती अशा मऊ ठिकाणी येतात. अनेकदा त्या सर्वांगावरही पसरू शकतात.

जिल्हा पशुसंवर्धन अधिकारी डॉ. सुरेखा माने यांनी सांगितले की, प्रशासनाने तज्ज्ञ डॉक्टरांची टीम तयार केली असून लम्पीग्रस्त जनावरांवर त्वरित उपचार व लसीकरण केले जात आहे. आतापर्यंत चार लाख ४६ हजार ९७८ जनावरांचे लसीकरण करण्यात आले आहे. या साथीचा संसर्ग जिल्ह्यातील सर्व तालुक्यात पसरला असून आतापर्यंत १,१४० जनावरे बाधित झाली असून ७७ जनावरे दगावली आहेत. ६६० जनावरे या आजारातून बरी झालेली असली, तरी अजून ४०३ जनावरे या आजाराशी झुंज देत आहेत.

‘लम्पी’चा नवा स्ट्रेन
सन २०२० मध्येदेखील या आजाराने डोके वर काढले होते. तेव्हा ‘लॉकडाऊन’चा काळ असल्यामुळे जनावरांचा बाहेर मुक्त वावर कमी होता. तेव्हा युद्धपाळीवर लसीकरण मोहीम राबविल्यामुळे साथ आटोक्यात आली. २५० ते ३०० नमुने पुण्याच्या प्रयोगशाळेकडे पाठविले होते. ते सर्व निगेटीव्ह आले होते. आता ‘लम्पी’ने स्ट्रेन बदलला आहे. जनावरांचे बाजार बंद केले असले तरी त्यांचा वावर बंद झालेला नाही. त्यामुळे यावेळी जनावरे बाधीत होत्याचे प्रमाण वाढलेला आहे.

फक्त गोवंश पशूच बाधित कसे
यासंदर्भात जिल्हा पशुसंवर्धन अधिकारी डॉ. सुरेखा माने यांनी सांगितले की, हा आजार फक्त गोवंश संवर्गातील जनावरांनाच होतो. कारण, या संवर्गातील जनावरांची रोग प्रतिकारक शक्ती कमी असते. अन्य जनावरांच्या तुलनेत या जनावरांची कातडी हलकी व मऊ असते. त्यामुळे विषाणूंचा शिरकाव या जनावरांमध्ये जलदगतीने होतो. त्यामुळे गोवंश वगळता अन्य जनावरांना हा आजार होत नाही.

Web Title: Fear not, beware, new strain of 'lumpy'; Obstacle only to bovine animals

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.