सकाळी ११ ते दुपारी ४ वाजेपर्यंत उष्माघाताची भीती; मनपाने उपचारासाठी उभारला स्वतंत्र वॉर्ड
By मुजीब देवणीकर | Published: May 17, 2023 07:34 PM2023-05-17T19:34:37+5:302023-05-17T19:34:58+5:30
उन्हाळा सुरू झाल्यापासून महापालिकेच्या आरोग्य विभागाने विविध वसाहतींमध्ये उष्माघातासंदर्भात पोस्टर्सद्वारे जनजागृती केली आहे.
छत्रपती संभाजीनगर : शहराचे तापमान सोमवारी ४० अंशापर्यंत पोहोचले. तापमानात आणखी वाढ होण्याची शक्यता हवामानतज्ज्ञांनी व्यक्त केली आहे. सकाळी ११ ते दुपारी ४ वाजेपर्यंत उष्माघाताचा धोका अधिक असतो. त्यामुळे नागरिकांनी खबरदारी घेणे हाच एकमेव मोठा उपाय आहे. महापालिकेच्या आरोग्य विभागाने चिकलठाण्यातील मेल्ट्रॉन हॉस्पिटल येथे उष्माघाताच्या रुग्णांसाठी एक स्वतंत्र कक्ष स्थापन केला आहे. शनिवारी एका आशा वर्करवर उपचार करण्यात आले.
उष्माघातामुळे रुग्णाचा जीवसुद्धा जाऊ शकतो. सकाळी ९ वाजेनंतर ऊन चांगलेच तापायला सुरुवात होते. वेगवेगळ्या कामांसाठी नागरिक घराबाहेर पडतात. उन्हापासून बचाव करणारे कापड डोक्याला बांधलेले नसते. अनेक जण पाण्याची बाटली सोबत ठेवत नाहीत. महापालिकेच्या आरोग्य विभागातील डॉक्टरांनी दिलेल्या माहितीनुसार नागरिकांनी आपली कामे शक्य असेल, तर सकाळी किंवा संध्याकाळी करावीत. घराबाहेर पडायचे असेल, तर डोक्याला रुमाल, महिलांनी स्कार्फ बांधवा; अन्यथा छत्रीचा वापर करावा. गरजेप्रमाणे थोडे- थोडे पाणी पीत राहावे. दररोज ८ ते १० ग्लासपेक्षा जास्त पाणी प्यावे. नारळपाणी, ताज्या फळांचा रस, ताक, लस्सी घ्यावी.
जनजागृतीवर भर
उन्हाळा सुरू झाल्यापासून महापालिकेच्या आरोग्य विभागाने विविध वसाहतींमध्ये उष्माघातासंदर्भात पोस्टर्सद्वारे जनजागृती केली. जाहीर प्रगटन वर्तमानत्रात दिले. आरोग्य केंद्रात येणाऱ्या रुग्णांना उन्हापासून कसे संरक्षण करावे यासंदर्भात मार्गदर्शन केले जाते.
आशा वर्करला त्रास
सावित्रीनगर भागातील मनपाच्या एका आशा वर्करला त्रास होत असल्यामुळे शनिवारी मेल्ट्रॉन हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले. तिच्यावर औषधोपचार करण्यात आल्याची माहिती आरोग्य विभागातील सूत्रांनी दिली.