शिक्षकांमध्ये भीतीचे वातावरण
By Admin | Published: October 7, 2016 12:47 AM2016-10-07T00:47:33+5:302016-10-07T01:32:20+5:30
औरंगाबाद : अनुदानाच्या मागणीसाठी मंत्रिमंडळ बैठकीवर विनाअनुदानित कृती समितीने नेलेल्या मोर्चात सहभागी शिक्षकांना पोलीस कधीही अटक करू शकतात,
औरंगाबाद : अनुदानाच्या मागणीसाठी मंत्रिमंडळ बैठकीवर विनाअनुदानित कृती समितीने नेलेल्या मोर्चात सहभागी शिक्षकांना पोलीस कधीही अटक करू शकतात, असे ‘मेसेज’ फिरल्यामुळे आज गुरुवारी शिक्षकांमध्ये भीतीचे वातावरण पसरले. दरम्यान, अनेक शिक्षकांनी आपले मोबाईल बंद करून भूमिगत होणेच पसंत केले.
मंगळवारी मंत्रिमंडळाच्या बैठकीवर शिक्षकांनी मोर्चा नेला होता. या मोर्चावर पोलिसांनी लाठीहल्ला केला. अनेक शिक्षकांना अटक करून त्यांच्याविरुद्ध गंभीर स्वरुपाचे गुन्हे दाखल केले.
एकीकडे अटक करण्यात आलेल्या शिक्षकांची जामिनावर सुटका करण्याच्या तयारीत असलेल्या शिक्षकांच्या ‘व्हॉटस्अॅप’वर मोर्चात सहभागी असलेल्या शिक्षकांना शाळेत जाऊन अटक केली जाणार असल्याचे ‘मेसेज’ फिरले. पोलिसांकडे व्हिडिओ शूटिंग असून, त्यात दिसणाऱ्या शिक्षकांची माहिती जमा करून त्यांना अटक केली जाणार आहे, अशा चर्चेला ऊत आला. त्यामुळे शिक्षकांमध्ये कमालीची घबराट पसरली असून, अनेक शिक्षक हे मोबाईल बंद करून भूमिगत झाले. काही जणांनी मोबाईलवर आलेले अनोळखी कॉलही टाळले. एकीकडे पोलिसांकडून अटक करण्याची भीती, तर दुसरीकडे गैरहजर राहिल्यास संस्थाचालकांकडून निलंबित केली जाण्याची भीती, अशी डोक्यावर टांगती तलवार घेऊन शिक्षक वावरत आहेत. दरम्यान, अनेक शिक्षक संघटनांनी लाठीहल्ल्याचा जाहीर निषेध करून शिक्षकांना दिलासा देण्याचा प्रयत्न केला.
नियमानुसार ४८ तास पोलीस कोठडीत असलेल्या सरकारी, निमसरकारी कर्मचाऱ्यांवर निलंबनाची कारवाई होते.
४आंदोलनामध्ये मोठ्या संख्येने शिक्षकांना अटक होण्याची ही पहिलीच वेळ आहे. मोर्चेकरी शिक्षकांना मंगळवारी अटक झाली असून, ४८ तासांपेक्षा जास्त कालावधीत ते पोलीस कोठडीत आहे.
४पोलीस विभागाकडून शिक्षणाधिकाऱ्यांना यासंबंधीची माहिती मिळाल्यानंतर शिक्षणाधिकारी हे संस्थाचालकांना संबंधित शिक्षकांविरुद्ध कारवाई करण्याचे आदेश देतील. त्यानंतर अटक असलेल्या शिक्षकांना निलंबनाचा सामना करावा लागेल, असे सूत्रांचे म्हणणे आहे.