अपहरणाच्या भीतीपोटी तरुणीने धावत्या रिक्षातून मारली उडी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 4, 2017 01:12 AM2017-08-04T01:12:32+5:302017-08-04T01:12:32+5:30
रिक्षाचालक दुसºयाच दिशेने रिक्षा घेऊन जात असल्याचे लक्षात येताच १७ वर्षीय प्रवासी तरुणीने धावत्या रिक्षातून उडी मारून स्वत:ची सुटका करून घेतली.
लोकमत न्यूज नेटवर्क
औरंगाबाद : रिक्षाचालक दुसºयाच दिशेने रिक्षा घेऊन जात असल्याचे लक्षात येताच १७ वर्षीय प्रवासी तरुणीने धावत्या रिक्षातून उडी मारून स्वत:ची सुटका करून घेतली. १ आॅगस्ट रोजी घडलेल्या या घटनेप्रकरणी सातारा ठाण्यात रिक्षाचालकाविरुद्ध अपहरणाचा गुन्हा नोंदविण्यात आला.
संजय संपतराव चौधरी (४५, रा. गारखेडा, चित्तेपिंपळगाव), असे आरोपी रिक्षाचालकाचे नाव आहे. पोलिसांनी सांगितले की, नक्षत्रवाडी येथील तरुणीला रेल्वेस्टेशन येथून नक्षत्रपार्क येथे जायचे होते. ती १ आॅगस्ट रोजी दुपारी ४ वाजेच्या सुमारास रेल्वेस्टेशन येथे आरोपीच्या रिक्षात (एमएच-२० बीटी-८८१५) बसली. रेल्वेस्टेशन येथून नक्षत्रपार्ककडे जाण्याऐवजी रिक्षाचालक बीड बायपासने एमआयटी कॉलेजकडे जात असल्याचे तिच्या लक्षात आले. आरोपी अपहरण करीत असल्याचा संशय आल्याने तिने त्यास इकडे कोठे नेत आहात, असे विचारले. मात्र, आरोपीने काहीच उत्तर दिले नाही. संशय बळावल्याने एमआयटी वाहतूक सिग्नलवर धावत्या रिक्षातून तरुणीने उडी मारली. या घटनेत ती जखमी झाली. याप्रकरणी पीडितेने दिलेल्या तक्रारीवरून सातारा ठाण्यात रिक्षाचालक चौधरीविरुद्ध गुन्हा नोंदविण्यात आला. सहायक उपनिरीक्षक बुट्टे तपास करीत आहेत.