कोरोनाच्या भीतीने व्यापाऱ्यांनी फिरविली कलिंगडांकडे पाठ
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 8, 2021 04:04 AM2021-03-08T04:04:47+5:302021-03-08T04:04:47+5:30
घाटनांद्रा : परिसरातील लोहगाव, चारनेर, धारला येथील अनेक शेतकऱ्यांनी या वर्षी कलिंगडाची शेती केली असून, पीकही जोमात ...
घाटनांद्रा : परिसरातील लोहगाव, चारनेर, धारला येथील अनेक शेतकऱ्यांनी या वर्षी कलिंगडाची शेती केली असून, पीकही जोमात आहे. मात्र, कोरोनाच्या भीतीने व्यापारी वर्गाने कलिंगडांकडे पाठ फिरविल्याने कलिंगड शेतात सडत पडले आहेत. यामुळे शेतकऱ्यांचे लाखो रुपयांचे नुकसान होत आहे.
लोहगाव येथील शेतकरी प्रवीण नामदेव मनगटे यांनी उत्पन्नात वाढ व्हावी, यासाठी अर्धा एकर शेतीत कलिंगड लागवड केलेली आहे. या कलिंगडांसाठी त्यांनी बी-बियाणे, खते, औषधी व मजुरी असा मोठा खर्च केला आहे. त्यांचे पीकही चांगलेच बहरात आलेले असून, या कलिंगडांना व्यापारी खरेदीदार मिळत नसल्याने ते परेशान आहेत. व्यापाऱ्यांशी संपर्क केल्यानंतर, लॉकडाऊन लागणार असल्याचे कारणे ते देत आहेत. कोरोनामुळे घेतलेला माल विक्री करण्यात अडचणी येणार असल्याने, व्यापारी पाठ फिरवित असल्याचे सध्या चित्र आहे. विशेष म्हणजे, तालुक्यात या पिकाला बाजारपेठच उपलब्ध नाही, शिवाय मालाच्या साठवणुकीसाठी गोडाऊनही उपलब्ध नसल्याचा फायदा व्यापारी उठवत आहेत. जे खरेदीसाठी येत आहेत, ते कोरोनाची भीती दाखवित मातीमोल भावाने कलिंगड खरेदी करीत आहेत. यामुळे बळीराजा संकटात सापडला आहे. मेहनत करूनही कलिंगडांना मातीमोल भाव मिळत असल्याने, नुकसान होत असल्याची माहिती शेतकरी गणेश मनगटे, कचरू मोरे, अशोक गुळवे यांनी व्यक्त केली.
कोट
उधार उसणवारीचे पैसे फेडणार कसे?
लॉकडाऊनची भीती असल्याने खरेदीदार मिळेनासे झाले आहे. त्याचा फायदा अनेक व्यापारी घेत असून, शेतकऱ्यांकडून मातीमोल भावाने खरेदी करीत आहेत. यामुळे उत्पादन खर्चही निघणे कठीण झाले आहे. अशा परिस्थितीत उसणवारी, कर्जाचे पैसे कसे फेडणार, असा प्रश्न आहे.
- प्रवीण मनगटे, कलिंगड उत्पादक शेतकरी, लोहगाव
फोटो : शेतात पडून असलेली कलिंगडे.