संवेदनाच गोठल्या! अपघातातील मृतांच्या अंगावरील सोने चोरले, उपजिल्हा रुग्णालयात प्रकार
By ऑनलाइन लोकमत | Updated: January 17, 2025 19:45 IST2025-01-17T19:43:18+5:302025-01-17T19:45:03+5:30
गंगापूर व परिसरात अपघातातील जखमी व मृतांच्या अंगावरील दागिने तसेच त्यांच्या जवळील रक्कम आणि इतर ऐवज लंपास करण्याचे प्रकार मोठ्या प्रमाणात वाढत आहेत

संवेदनाच गोठल्या! अपघातातील मृतांच्या अंगावरील सोने चोरले, उपजिल्हा रुग्णालयात प्रकार
गंगापूर : मृताच्या टाळूवरील लोणी खाणे म्हणजे काय, याचा प्रत्यय बुधवारी रात्री गंगापूर उपजिल्हा रुग्णालयामध्ये आला. मृतदेहावरील पावणेतीन लाखांचे सोन्याचे दागिने व जखमीच्या खिशातील १३ हजार रुपये चोरीस गेल्याने माणसातील संवेदनाच मृत झाल्याचा प्रत्यय आला. याप्रकरणी गंगापूर पोलिस ठाण्यात प्रारंभी पोलिसांनी तक्रार नोंदवून घेतली नाही. त्यानंतर नागरिक व समाजसेवकांनी दबाव निर्माण केल्यानंतर गुरुवारी सायंकाळी सात वाजता गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
हैदराबाद येथील १४ भाविक मंगळवारी शिर्डी येथे आले होते. दर्शन घेऊन ते बुधवारी सकाळी जीपमधून वेरूळ लेण्या पाहून व घृष्णेश्वराचे दर्शन घेऊन गंगापूरमार्गे शिर्डीला जात असताना रात्री १० वाजेच्या सुमारास तांबूळगोटा फाटा येथे त्यांच्या जीपला भीषण अपघात झाला होता. या अपघातात वैद्विक श्यामशेट्टी (६ महिने), अक्षिता गडकुनुरी (वय २१) व प्रेमलता श्यामशेट्टी (५८) व प्रसन्ना लक्ष्मी (४५) यांचा मृत्यू झाला. त्यामुळे गुरुवारी सकाळी मृतांचे नातेवाईक हे गंगापूर येथे आले असता त्यांना मृतांच्या अंगावर असलेले दागिने आढळून आले नाहीत. याप्रकरणी त्यांनी रुग्णालयातील कर्मचाऱ्यांकडे विचारपूस केली असता त्यांना कोणीही माहिती दिली नाही.
यानंतर त्यांनी गंगापूर पोलिसांकडे धाव घेऊन गुन्हा दाखल करण्याची मागणी केली; मात्र पोलिसांनी याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यास टाळाटाळ केल्याने मृतांच्या नातेवाइकांनी येथील समाजसेवक अमोल जगताप, राहुल वानखेडे तसेच शिर्डी येथून मदतीसाठी आलेले अरविंद कोते यांच्याकडे मदत मागितली. त्यानंतर या सर्वांनी त्यांना सहकार्य करून पोलिसांना गुन्हा दाखल करण्यास भाग पडले. याप्रकरणी गुरुवारी सायंकाळी सात वाजेच्या सुमारास मनीकंठ रमेश श्यामशेट्टी यांच्या फिर्यादीवरून गंगापूर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. मनीकंठ यांनी दिलेल्या फिर्यादीत नमूद केले आहे की, त्यांच्या मृत चुलती, भाची यांच्या अंगावरील २ लाख ७० हजार रुपयांचे सोने व जखमी व्यंकटेश श्यामशेट्टी यांच्या खिशातील रोख १३ हजार रुपये चोरी झाले आहेत.
वारंवार घटना घडू लागल्या
गंगापूर व परिसरात अपघातातील जखमी व मृतांच्या अंगावरील दागिने तसेच त्यांच्या जवळील रक्कम आणि इतर ऐवज लंपास करण्याचे प्रकार मोठ्या प्रमाणात वाढत असून, याची पोलिस प्रशासनाने दखल घेऊन या प्रकाराला पायबंद घालण्याची मागणी अमोल जगताप यांनी केली आहे.