अवधूताच्या चरणी रंगला ‘नाथ’रंगी स्वरसोहळा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 30, 2017 12:14 AM2017-12-30T00:14:37+5:302017-12-30T00:14:57+5:30
दरवर्षाप्रमाणे यावर्षीही पैठण येथे दत्तजयंती संगीत महोत्सव उत्साहात साजरा करण्यात आला. गुलाबी थंडीत हा सोहळा सुरांच्या रंगात ‘नाथ’रंगी सुरेख रंगल्याने श्रोते मंत्रमुग्ध झाले.
लोकमत न्यूज नेटवर्क
पैठण : दरवर्षाप्रमाणे यावर्षीही पैठण येथे दत्तजयंती संगीत महोत्सव उत्साहात साजरा करण्यात आला. गुलाबी थंडीत हा सोहळा सुरांच्या रंगात ‘नाथ’रंगी सुरेख रंगल्याने श्रोते मंत्रमुग्ध झाले.
नाथवंशज व प्रसिद्ध गायक मिलिंदबुवा गोसावी यांनी हा शास्त्रीय संगीताचा व्यासंग दिग्गजांच्या सहवासातून या व्यासपीठापर्यंत जोडला आहे.
आर्या माने हिने राग यमन गाऊन महोत्सवास प्रारंभ केला. या महोत्सवास प्रमुख पाहुणे म्हणून औरंगाबादचे डॉ. भवान महाजन, तर अध्यक्षस्थानी ह.भ.प. नाथवंशज रावसाहेब महाराज होते. महोत्सवात गायक डॉ. वैशाली देशमुख यांनी राग रागेश्री, भूप व अभंग, तर गायिका आदिती गोसावीने राग हंसध्वनी व ठुमरी, मिलिंदबुवा गोसावी यांनी राग गोरख, कल्याण व दोन अभंग गाऊन सर्वांना मंत्रमुग्ध केले. तबलावादक संतोष देशमुख, उदय नाईक यांनी उत्कृष्ट साथ देऊन रंगत आणली. गायक राजेश सरकटे यांनीही या सोहळ्यास हजेरी लावून संगीताचा सूर अधिक वाढविला. गौरी गोसावी व ओंकार गोसावी यांनी सूत्रसंचालन केले.
चंद्रशेखर गोसावी यांनी प्रास्ताविकात या महोत्सवाचा उद्देश स्पष्ट केला. डॉ. भवान महाजन यांनी नाथवंशज संगीत परंपरेबद्दल माहिती दिली.
रावसाहेब महाराजांनी या संगीत परंपरेची विशेषता सांगितली. या कार्यक्रमासाठी हरिपंडितबुवा गोसावी, पुष्कर महाराज, प्रशांत गोसावी, दीप्ती मंगिराज, किशोर देशमुख आदींनी सहकार्य केले. हा महोत्सव उपस्थित कलाकार व रसिकांना एका अपार आनंदाची अनुभूती देऊन गेला.
शास्त्रीय संगीताचा वारसा
शास्त्रीय संगीताचा वारसा लाभलेले हे नाथ घराणे शांतीब्रह्म संत श्री एकनाथ महाराजांचे वंशज आहेत. त्यांनीच हा महोत्सव सुरू केला. नाथवंशज व गायक मिलिंदबुवा गोसावी यांनी हा महोत्सव उंचीवर नेण्याचा दर्जा या कलाकारांच्या रूपाने राखला आहे. पुढील वर्षी याची व्याप्ती वाढविण्याचा निर्धार त्यांनी केला.