कर्करोगमुक्ती देणाऱ्या डॉक्टरांचा रुग्णाच्या कुटुंबियांकडून सत्कार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 6, 2019 11:35 PM2019-06-06T23:35:34+5:302019-06-06T23:35:54+5:30
कर्करोग म्हटले की, अनेकांच्या काळजाचा ठोका चुकतो. मात्र, वेळीच उपचार घेतल्यास त्याला रोखणे शक्य आहे. अशाच प्रकारे मुखकर्करोगाची शस्त्रक्रिया यशस्वी करून कर्करोगमुक्त झालेले भूमी अभिलेख कार्यालयातील कार्यालयीन अधीक्षक रवींद्र कांबळे यांच्या कुटुंबियांनी गुरुवारी शासकीय कर्करोग रुग्णालयातील (राज्य कर्करोग संस्था) डॉक्टरांचा सत्कार करून आगळीवेगळी कृतज्ञता व्यक्त केली.
औरंगाबाद : कर्करोग म्हटले की, अनेकांच्या काळजाचा ठोका चुकतो. मात्र, वेळीच उपचार घेतल्यास त्याला रोखणे शक्य आहे. अशाच प्रकारे मुखकर्करोगाची शस्त्रक्रिया यशस्वी करून कर्करोगमुक्त झालेले भूमी अभिलेख कार्यालयातील कार्यालयीन अधीक्षक रवींद्र कांबळे यांच्या कुटुंबियांनी गुरुवारी शासकीय कर्करोग रुग्णालयातील (राज्य कर्करोग संस्था) डॉक्टरांचा सत्कार करून आगळीवेगळी कृतज्ञता व्यक्त केली.
शासकीय कर्करोग रुग्णालयातील सभागृहात हा कार्यक्रम झाला. यावेळी प्रभारी अधिष्ठाता डॉ. वर्षा रोटे-कागीनाळकर, कर्करोग रुग्णालयाचे विशेष कार्य अधिकारी डॉ. अरविंद गायकवाड, डॉ. भारत सोनवणे, डॉ. गजानन सुरवाडे, डॉ. अर्चना राठोड, डॉ. सुरेखा बणे, डॉ. दीपक बोकनकर, डॉ. आलापुरे, डॉ. सोनल चौधरी, रतनकुमार पंडागळे, रामेश्वर लांडगे, संदीप भंडागे, बालाजी देशमुख, वर्षा कांबळे, दिगंबर पोळ आदींची उपस्थिती होती. यावेळी रवींद्र कांबळे यांचे संपूर्ण कुटुंबीय, नातेवाईक-मित्र परिवार उपस्थित होते. कांबळे यांच्यावर एप्रिल महिन्यात मुखकर्करोगाची शस्त्रक्रिया पार पाडली. ही शस्त्रक्रिया यशस्वी झाल्याने रुग्णालयातील डॉ. अजय बोराळकर यांचा कांबळे कुटुंबियांतर्फे सत्कार करण्यात आला. यावेळी रुग्णालयाला व्हिल चेअरचीही भेट देण्यात आली. डॉ. अरविंद गायकवाड, डॉ. वर्षा रोटे यांनी मनोगत व्यक्त केले. प्रा. प्रताप कोचुरे यांनी सूत्रसंचालन केले.
रुग्णालयाची विश्वासार्हता
शासकीय सेवेत असल्याने खाजगी रुग्णालयात कर्करोगाचे उपचार घेणे शक्य होते; परंतु शासकीय कर्करोग रुग्णालयाच्या विश्वासार्हतेमुळे, प्रत्येकाने दिलेला धीर आणि डॉक्टरांनी यशस्वी केलेल्या शस्त्रक्रियेमुळे कर्करोग दूर झाल्याची भावना रवींद्र कांबळे यांनी व्यक्त केली.