दारूविरोधात महिला आक्रमक
By Admin | Published: June 24, 2017 11:38 PM2017-06-24T23:38:57+5:302017-06-24T23:39:45+5:30
आष्टी : शहरातील वडार गल्ली येथील महिलांनी दारू विक्रेत्यांच्या उपद्रवामुळे होणाऱ्या त्रासाला कंटाळून या गल्लीतील सुमारे पंचवीस महिलांनी दारु बंद करण्याचा निर्धार केला आहे
लोकमत न्यूज नेटवर्क
आष्टी : शहरातील वडार गल्ली येथील महिलांनी दारू विक्रेत्यांच्या उपद्रवामुळे होणाऱ्या त्रासाला कंटाळून या गल्लीतील सुमारे पंचवीस महिलांनी दारु बंद करण्याचा निर्धार केला आहे. यासाठी आज महिलांनी पोलीस ठाण्यात ठिय्या देऊन प्रशासनाने गल्लीतील दारू बंद करावी, अन्यथा सर्व महिला एकत्र येऊन दारू विक्रेत्यांचा बंदोबस्त करतील, असा इशारा यावेळी निवेदनाद्वारे देण्यात आला आहे.
आष्टी शहरात मोठ्या प्रमाणात दारू विक्रेत्यांचा उपद्रव वाढला आहे. याबाबत ग्रामस्थांनी पोलीस प्रशासनाकडे अनेकवेळा दाद मागितली. मात्र, पोलिसांनी ग्रामस्थांच्या मागणीकडे दुर्लक्ष केले असल्याने अखेरीस महिलांनी संघटन करण्याचा निर्णय घेतला.
सुरेखा विटकर, शोभा विटकर, छाया विटकर, चंद्रकला मुरकूटे, संगीता मुरकुटे, जया विटकर, संगीता देवकर, सविता विटकर, उषा विटकर, सरुबाई विटकर, लक्ष्मी विटकर, चांगुणा विटकर, मनीषा ननवरे यांच्यासह महिलांनी पोलीस ठाण्यात ठिय्या मांडत दारू बंदीबाबत मागणी केली. याप्रसंगी सुरेखा विटकर यांनी गावातील समस्या मांडताना गावातील अवैध धंद्याकडे लक्ष वेधले. संबंधित दारू विक्रेते पोलीस प्रशासनासोबत संबंध जोपासून गावात राजरोसपणे दारुविक्री करतात. परिणामी तरुण, ज्येष्ठांसह काही अल्पवयीन व्यसनाधीन बनले आहेत. त्यामुळे अनेकांचे संसार उद्ध्वस्त होण्याची वेळ आली असून, शांतता भंग होत आहे. पोलीस ठाण्यात अचानक आलेल्या या महिलांमुळे पोलिसांची चांगलीच धावपळ उडाली
होती.